राज्यात सत्ता परिवर्तन होईल- शरद पवार

0
460

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – ‘महाराष्ट्रातील राजकीय चित्र पाहिल्यानंतर नवीन पिढी परिवर्तनासाठी अनुकूल असून, राज्यात सत्ता परिवर्तन होईल’, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत सोमवारी वर्तवले. ‘गेली पाच वर्षे राज्यातील भाजप-शिवसेना सरकारकडून जनतेच्या अपेक्षांची पूर्तता झाली नाही. जनतेच्या त्या विश्वासाला सत्ताधाऱ्यांनी तडा दिल्यामुळेच राज्यात बदल होईल यात मला काहीच शंका वाटत नाही’, असे पवार म्हणाले. तसेच, ‘बीड जिल्ह्यातील मुंडे कुटुंबातील वादाबाबत आक्षेप घेण्यासारखे काही गंभीर वाटत नाही’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी मुंबईत मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. ‘गेल्या पाच वर्षांत शेती, शेतकऱ्यांच्या समस्या, वाढत्या आत्महत्या हे प्रश्न निर्माण झाल्या आहेत. शिवाय, औद्योगिक क्षेत्रात आघाडीचे असलेल्या महाराष्ट्रात आता ५० टक्के कारखानदारी बंद पडली असून, कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हे मुद्दे जनतेत अस्वस्थता निर्माण करणारे आहेत. यामुळे राज्यात परिवर्तन होईल असे वाटते’, असे पवार म्हणाले.

‘काही लोकांनी कारण नसताना माझे पुन्हा पुन्हा वय काढले. पण, प्रचाराच्या निमित्ताने सर्वत्र जाता आले. नव्या पिढीशी बोलताना मला कुठेच जनरेशन गॅप दिसली नाही. यामुळेच राज्यात परिवर्तन होईल. सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर आणि नगर या पश्चिम महाराष्ट्रातील जागा तसेच, औरंगाबाद येथे राष्ट्रवादीला उत्तम प्रतिसाद आहे’, असे ते म्हणाले.