शरद पवार भविष्यात अजित पवार नव्हे तर यांना मुख्यमंत्री करतील

0
366

सांगली, दि. २४ (पीसीबी) – भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्याची वेळ आलीच तर शरद पवार अजितदादांना नाही तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. राज्यात गेल्या वर्षी आजच्याच दिवशी भाजपाकडून करण्यात आलेल्या सत्तास्थापनेच्या अयशस्वी प्रयत्नाला वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उजाळा दिला आणि भाजपाच्या जखमांवर मीठ चोळले. या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी त्याच भाषेत उत्तर दिले आहे.

सांगलीतल्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले आहे “आता कितीही गोडवे गायले तरीही गेल्या वर्षी तीन दिवसांसाठी का होईना अजितदादांना काकांना सोडले होते हा इतिहास आहे. भविष्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची वेळ आलीच तर शरद पवार हे अजित पवारांना नाही तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

राज्यात गेल्या वर्षी आजच्याच दिवशी पहाटेचा शपथविधी पार पडला होता. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली होती. मात्र हे सरकार तीनच दिवस टिकले. या अयशस्वी प्रयोगाला एक वर्ष पूर्ण झाल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपावर निशाणा साधला. या सगळ्या नेत्यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस ही दरबारी लोकांची पार्टी आहे आणि भाजपा हा सामान्य लोकांचा पक्ष आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

आम्ही फडणवीसांना टरबुज्या म्हणत नाही आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा होतो त्याबद्दल त्यांनी राग मानू नये अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली होती. त्यावरही चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी कोथरुडला अडकलो होतो. त्यामुळे इस्लामपुरात फारसे लक्ष देता आले नाही… नाहीतर इस्लामपुरात जयंत पाटील यांची सुट्टी केली असती मग ते राज्याचेच नव्हे तर तालुक्याचे नेते राहिले असते. आता आगामी निवडणुकीत पाहूच असाही टोला त्यांनी लगावला.