शरद पवारांवर टीका करून मोठे होण्याचा बालिशपणा करू नका; धनंजय मुंडेंचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा  

0
612

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करून राजकारणामध्ये मोठे होण्याचा बालिशपणा करू नका, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी  पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.

माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या प्रसंगी मुंडे बोलत होते.

मुंडे म्हणाले की, शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही,  असा राजकीय इतिहास महाराष्ट्रात  आहे.  लोकसभेनंतर भाजप आणि शिवसेना हे फोडा फोडीचे राजकारण करत आहेत.  भाजपा आणि सेनेला सत्तेची मस्ती चढली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या संपर्कात आमच्या पक्षाच्या कोणत्या व्यक्ती आहेत ते त्यांनाच माहित आहे. मात्र आमच्याही संपर्कात भाजपचे काहीजण आहेत,  असेही मुंडे  म्हणाले.  भाजपला अनेक  मतदारसंघात उमेदवार मिळत नाहीत, ही दुर्दैवी बाब त्यांनी आधी कबूल करावी, असेही मुंडे म्हणाले.