“शमीला वाटते तो खूप मोठा क्रिकेटर आहे”, अटक वॉरंटवर पत्नी हसीन जहाँची प्रतिक्रिया

0
528

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर पत्नी हसीन जहाँने न्यायव्यवस्थेचे आभार मानले आहेत. हसीन जहाँने गतवर्षी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पश्चिम बंगालच्या अलीपूर कोर्टाने शमीविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने शमीला आत्मसमर्पण करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.

“मी न्यायव्यवस्थेची आभारी आहे. मी जवळपास गेल्या एक वर्षापासून न्याय मिळवण्यासाठी झटत आहे. शमीला आपण खूप प्रभावशाली तसेच खूप मोठे क्रिकेटर आहोत असे वाटते,” अशी प्रतिक्रिया हसीन जहाँ यांनी एका वृत्तवाहिनीश बोलताना व्यक्त केली आहे.

“जर मी पश्चिम बंगालची नसते, जर ममता बॅनर्जी आमच्या मुख्यमंत्री नसत्या तर मी येथे सुरक्षित राहू शकले नसते. उत्तर प्रदेशातील अमरोहा पोलीस सतत मला आणि माझ्या मुलीला त्रास देत होते. पण सुदैवाने त्यांना यश मिळाले नाही,” असेही हसीन जहाँ यांनी म्हटले आहे.