शब्दसुरांनी रंगली ‘दिवाळीसांज’

0
333

पिंपरी,दि.२ (पीसीबी) “कळस जरी सोन्याचा असला तरी दगडाच्या पायरीवरच डोके टेकवतात. त्यामुळे देवळाची पायरी नेहमी पवित्र असते; तसेच रसिकांचे अस्तित्व हे कोणत्याही कार्यक्रमात पाहुण्यांपेक्षा जास्त महत्त्वाचे असते!” असे उद्गार नगरसेविका शैलजा मोरे यांनी बीना इंग्लिश मीडियम स्कूल, पांढारकरनगर, आकुर्डी येथे सोमवार, दिनांक ०१ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना काढले. रमा एकादशी आणि वसुबारस या दिवाळीच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाने पंधरा कवी आणि पंधरा हौशी गायक कलावंत यांचा सहभाग असलेली शब्दसुरांची ‘दिवाळीसांज’ ही अनोखी मैफल आयोजित केली होती. सामाजिक कार्यकर्ते सलिम शिकलगार, संदीप जाधव, बीना एज्युकेशनल सोसायटीचे संचालक आझमखान, नवयुगच्या सचिव माधुरी ओक यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव यांनी आपल्या मनोगतातून महानगरपालिकेने स्थानिक साहित्यिकांना साहाय्य म्हणून पंधरा हजार रुपयांचे अनुदान किंवा पुस्तकांच्या शंभर प्रतींची खरेदी करावी आणि अभिव्यक्तीसाठी सुसज्ज सभागृह उपलब्ध करून द्यावे, अशा तीन मागण्या केल्या. या वेळी मागण्यांच्या पत्रावर साहित्यिकांच्या सह्या घेण्यात आल्या. लवकरच ते पत्र संबंधित मान्यवरांना पोहचवण्यात येणार आहे.

नवयुगचे कार्याध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील यांनी प्रास्ताविकातून मंडळाच्या अठ्ठावीस वर्षांच्या उपक्रमांचा आढावा घेतला. माधुरी विधाटे यांनी शारदास्तवन म्हटले. यावेळी ‘पवनेचा प्रवाह’ या दिवाळी अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

“निराकार, निर्गुण असा परमेश्वर
संकटी शक्तिरूपी धावून ये सत्वर”

या जयश्री श्रीखंडे यांच्या स्वरचित भक्तिरचनेने ‘दिवाळीसांज’ या वैशिष्ट्यपूर्ण मैफलीचा प्रारंभ झाला. स्वरचित कविता आणि पारंपरिक संतकाव्य, भावगीते, अभिजात चित्रपटगीते अशा एकापाठोपाठ एक अशा सुरेल रचनांनी मैफलीत रंग भरायला सुरुवात झाली. आय. के. शेख यांची “नको मारू खडा…” ही खड्या आवाजातील गवळण श्रोत्यांना भावली; तर संगीता झिंजुरके यांची “वेडी मी वेडी राधा गं…” या सुरेल भावगीतावर रसिकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा ठेका धरला. “मानव जनम अनमोल रे…” या आनंद मुळूक यांच्या गीताने श्रोत्यांना अंतर्मुख केले; तर “आनंदे चालू या पंढरीची वाट…” या कैलास भैरट यांच्या भक्तिगीताने आनंदाची अनुभूती दिली. शरद शेजवळ यांच्या “सखू आली पंढरपूरा…” या तन्मयतेने सादर केलेल्या भावपूर्ण कवितेने अध्यात्माचा रंग अधिकच गहिरा झाला. प्रदीप गांधलीकर यांचा अभंग, दत्तू ठोकळे यांची गझल, वर्षा बालगोपाल यांची “अंतरंग बहिर्रंग पांडुरंग…” ही रचना आणि शिवाजीराव शिर्के यांची ‘दिवाळी’ या कविता उल्लेखनीय होत्या. या स्वरचित कवितांच्या मध्ये सुप्रिया लिमये, सुनीता यन्नावार, भावना क्षीरसागर, रजनी गांधी, वीणा यन्नावार, मनीषा मुळे, माधुरी डिसोजा, रेणुका हजारे, सीमा मुळे, अरुणा वाकनीस, अंजली सोनवणे, अनुराधा कुलकर्णी यांनी सादर केलेल्या पारंपरिक रचनांमुळे श्रोत्यांना पुनप्रत्ययाचा श्रवणानंद मिळाला. युवा गायक अक्षय लोणकर यांनी गीत सादरीकरणाचे प्रात्यक्षिक दाखविले. सात वर्षांचा अन्वेष देशपांडे ते ऐंशी वर्षांच्या राधाबाई वाघमारे अशा विविध वयोगटातील कलावंत-कवी यांच्या सहभागाने उत्तरोत्तर रंगत गेलेली ‘दिवाळीसांज’ अविस्मरणीय ठरली. अनिकेत गुहे, पी. बी. शिंदे, रजनी अहेरराव, उज्ज्वला केळकर, अश्विनी कुलकर्णी, रमेश वाकनीस, शरद काणेकर यांनी संयोजनात परिश्रम घेतले. नंदकुमार मुरडे यांनी कार्यक्रमाचे तर राजेंद्र घावटे यांनी मैफलीचे सूत्रसंचालन केले. संपत शिंदे यांनी आभार मानले.