व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी मैत्रिणीला रस्त्यात गाठून मारहाण; मित्रावर गुन्हा दाखल

0
520

चाकण, दि. १५ (पीसीबी) – मैत्रिणीबाबत पझेसिव्ह असलेल्या तरुणाने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या आदल्या दिवशी मैत्रीण तिच्या दुस-या मित्रासोबत जात असताना पझेसिव्ह असलेल्या तरुणाने तिच्या मित्रासोबत भांडण केले. त्यानंतर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सकाळच्या वेळी कामावर निघालेल्या मैत्रिणीला रस्त्यात गाठून मारहाण केली. हा प्रकार सोमवारी (दि. 14) सकाळी पावणे सहा वाजता नाणेकरवाडी येथे घडला.

याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश कांबळे (रा. नांदेड. पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी 23 वर्षीय तरुणी तिच्या तीन मैत्रिणींसोबत नाणेकरवाडी येथे भाड्याने राहते. ती चाकण एमआयडीसी मधील एका कंपनीत नोकरी करते. मागील सहा महिन्यांपूर्वी तरुणी तिच्या गावाहून पुण्याला येत असताना प्रवासात तिची ओळख अविनाश कांबळे याच्यासोबत झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. अविनाश कांबळे हा तरुणीवर फार हक्क गाजवू लागल्याने तीन महिन्यांपासून तरुणी अविनाश सोबत बोलत नव्हती.

तरीदेखील अविनाश याने तरुणीसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने त्याला प्रतिसाद दिला नाही. रविवारी (दि. 13) संध्याकाळी साडेआठ वाजता फिर्यादी तरुणी तिच्या मित्रासोबत मार्केटला जात होती. त्यावेळी अविनाश याने तरुणीच्या सोबत असलेल्या मित्रासोबत भांडण केले. त्याबाबत तरुणीने पोलिसात तक्रार दिली आहे.

सोमवारी (दि. 14) सकाळी पावणे सहा वाजता तरुणी कंपनीत कामावर जाण्यासाठी निघाली. त्यावेळी तिला अविनाश याने रस्त्यात अडवले. त्याने तरुणीच्या तोंडाला बांधलेला स्कार्फ ओढून काढला. त्यानंतर त्याच्या हातातील लोखंडी कड्याने तरुणीच्या डोक्यात मारले. त्यात तरुणी जखमी झाली. अविनाश याने तरुणीला शिवीगाळ करत ‘दुस-या कोणासोबत दिसली तर मारहाण करण्याची धमकी दिली.

तरुणीने आरडाओरडा केला असता नागरिक जमा झाले. त्यानंतर तरुणी कंपनीच्या बसमध्ये बसून कंपनीत गेली. तिच्या नातेवाईकांशी चर्चा करून तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.