अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्या होणार, बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचा-यांची मागविली माहिती

0
191

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील गट ‘अ’ ते ‘ड’ मधील एप्रिल व मे महिन्यात बदलीसाठी पात्र ठरणा-या अधिकारी, कर्मचा-यांची 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रशासन विभागाने यादी मागविली आहे. मुदतीनंतर आलेले अर्ज प्रशासन विभागाकडून स्वीकारले जाणार नसल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे धोरण 2011 साली तयार करण्यात आले आहे. एकाच विभागात तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे अधिकारी व कर्मचारी बदलीस पात्र ठरतात. या धोरणानुसार बदलीस पात्र ठरणारे तसेच वैयक्‍तिक व वैद्यकीय कारणास्त बदली हवी असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी पाठविण्यात यावी.

28 फेब्रुवारीपर्यंत विभागप्रमुखांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रशासनाकडे यादी पाठवावी. मुदतीनंतर आलेले अर्ज प्रशासन विभागामध्ये स्वीकारले जाणार नाहीत. त्याचबरोबर ज्या अधिकारी, कर्मचा-यांनी बदली मिळण्याबाबतचा विभागामध्ये दाखल केलेला अर्ज संबंधित विभागाने प्रशासनास पाठविला नाही. त्याबाबत तक्रारी दाखल झाल्यास विभागप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची स्पष्ट नोंद घ्यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.