वेगळा विचार करुन तो अमलात आणणारी माणसेच समाजपयोगी कामे करू शकतात !

0
308

पिंपरी ,दि.१५ (पीसीबी) -वेगळा विचार करुन तो अमलात आणणारी माणसेच समाजपयोगी कामे करू शकतात असे मत प्रतिभा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि अनिस च्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे साहित्यिक डॉ राजेंद्र कांकरिया यांनी व्यक्त केले.निगडी येथील सृजन प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित समाजदूत या पुरस्कार सोहळ्यात मुख्य पाहुणे म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र कामगार परिषदेच्या अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुलें आणि जेष्ठ पत्रकार विवेक इनामदार उपस्थित होते.

आदर्श शिक्षक म्हणून निवृत्त झालेल्या दिगंबरराव कुलकर्णी यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने सृजन प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली असून या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक ,शैक्षणिक ,साहित्य, पत्रकारिता, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात बहुमूल्य समाजपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तीचा गौरव केला जातो. या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष होते.
पिंपरी चिंचवड मधील जेष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर,सुनील लांडगे यांच्यासह जेष्ठ साहित्यिक प्रा.तुकाराम पाटील,व्याख्याते आणि कवी राजेंद्र घावटे आणि गझलकार, कवी ,लेखक अशा विविध भूमिका चपलख निभवणारे राज अहेरराव यांना यावर्षीचे समाजदूत म्हणून सन्मानित करण्यात आले.आणखी एक पुरस्कार प्राप्त पत्रकार विश्वास मोरे काही अत्यावश्यक कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही.

शाल, पुस्तक आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे वैशिष्ट्य होते.
शहरात वास्तव्यास असूनही अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष स्व.नागनाथ कोतापल्ले यांच्या निवासस्थानाजवळ त्यांच्या नावाचा उल्लेख नसल्याची खंत व्यक्त करताना पुरुषोत्तम सदाफुले यांनी शहराच्या वैभवात सांस्कृतिक भर घालणाऱ्या महान साहित्यिकाची अवहेलना होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करताना सृजन प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमाचे कौतुकही केले.यावेळी सर्व पुरस्कार्थी समाजदूतांनी आपले मनोगत अतिशय सुंदररित्या व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सृजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी तर मार्गदर्शक सुरेश कंक यांनी मनोगत व्यक्त केले.सविता इंगळे यांनी उत्तम सूत्रसंचालन केले तर वर्षा बलगोपाल यांनी अभिनव पध्दतीने आभारप्रदर्शन केले.