वीस हजारांच्या खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा; एकास अटक

0
492

चाकण, दि. १ (पीसीबी) – दोघांनी मिळून एका व्यक्तीकडे 20 हजार रुपये खंडणीची मागणी केली. व्यक्तीने खंडणी देण्यास नकार दिला असता ‘मी कोण आहे तुला माहीत नाही का, मी एकाचा खून करून जेलमध्ये जाऊन आलो आहे’ अशी धमकी दिली. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 31) दुपारी खेड तालुक्यातील कडाचीवाडी येथे घडली.

विराज कड (वय 19, रा. कडाचीवाडी, ता. खेड) याला अटक केली आहे. त्याच्यासह त्याच्या एका मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिनेश शामराव लांजेवार (वय 46, रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सव्वाबारा वाजता फिर्यादी त्यांच्या घरासमोर थांबले असताना आरोपी एका दुचाकीवरून आले. विराज याने फिर्यादी यांच्याकडे ‘तू आजच्या आज वीस हजार रुपये दे’ अशी पैशांची मागणी केली. मी कर्ज काढून घर बांधले आहे. एवढे पैसे माझ्याकडे नाहीत. मी तुला पैसे देणार नाही’ असे फिर्यादी यांनी समजावले असता आरोपी विराज याने ‘मी कोण आहे तुला माहीत नाही का, मी एकाचा खून करून जेलमध्ये जाऊन आलो आहे’ अशी धमकी दिली. तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.