“विरोधकांनी आपले नियंत्रण सोडू नये”, नरेंद्र मोदींचा इशारा

0
198

नवी दिल्ली,दि.२१(पीसीबी) : “राज्यसभेत विरोधकांच्या झालेल्या प्रचंड गोंधळात दोन कृषी विधेयकं रविवारी मंजूर करण्यात आली. सभापतींकडून गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कृषी विधेयकांसंबंधी बोलताना काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. नरेंद्र मोदींच्या हस्ते बिहारमधील नऊ राष्ट्रीय महामार्गांचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भूमीपूजन करण्यात आलं. यावेळी मोदी बोलत होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेदेखील यावेळी उपस्थित होते.

“मुलभूत आधार किंमतीवरुन (MSP) शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे, हे तेच लोक आहेत जे गेल्या कित्येक वर्षांपासून एमएसपीवरील स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करत होते,” अशी टीका त्यांनी केली. यावेळी नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीका करताना कृषी क्षेत्रातील ऐतिहासिक बदलांनंतर काही लोकांच्या हातून नियंत्रण सुटताना दिसत असल्याचं म्हटलं.

पुढे बोलताना नरेंद्र मोदी असंही म्हणाले कि,“नवे बदल कृषी बाजारांच्या विरोधात नाहीत हे मला स्पष्ट करायचं आहे. तिथे आधी होत होतं तसंच काम होत राहील. उलट आमच्या एनडीए सरकारने कृषी बाजारांना अत्याधुनिक करण्याचं काम केलं आहे. कृषी बाजारांमधील कार्यालयांसाठी तसंच संगणकीकरण करण्यासाठी गेल्या पाच सहा वर्षांपासून देशात मोठं अभियान चालवलं जात आहे,” अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली. ‘त्यामुळे जर कोणी सांगत असेल की नवीन बदलांनंतर कृषी बाजारांवर संकट येईल तर ते शेतकऱ्यांशी खोटं बोलत आहेत,’ असं मोदींनी म्हटलं आहे.

पुढे त्यांनी हे हि सांगितलं कि, “आपल्या देशात आतापर्यंत उत्पन्न विक्रीची जी व्यवस्था सुरु होती, जे कायदे होते त्यामुळे शेतकऱ्यांचे हात-पाय बांधले गेले होते. या कायद्यांची मदत घेत काही ताकदवान टोळी निर्माण झाल्या होत्या ज्या शेतकऱ्यांच्या हतबलेचा फायदा घेत होते. पण हे कधीपर्यंत चालणार होतं? कृषी क्षेत्रातील नव्या बदलांनी देशातील शेतकऱ्याला आपलं पीक, फळं, भाज्या कोणालाही आणि कुठेही विकण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. जर त्याला मार्केटमध्ये जास्त फायदा मिळत असेल तर तिथे विकेल. मार्केटव्यतिरिक्त अन्य कुठे फायदा मिळत असेल तर तिथे विकण्याचीही मनाई नसेल.”