विधान परिषद बिनविरोध करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे दोन उमेदवार असल्याने पेच कायम

0
346

मुंबई, दि.१०(पीसीबी) – विधानपरिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. कॉंग्रेसने आपले दोन उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सहा जागा लढवण्याबाबत काँग्रेस अजूनही ठाम आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दुसऱ्या उमेदवारांची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत चिंता वाढलीय. दरम्यान शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी रात्री 10 च्या सुमारास बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही थोरातांना उमेदवार मागे घेण्यासाठी संपर्क केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी विशेष आग्रही असल्याचे दिसले.

उमेदवार कसा निवडून आणायचा यावर चर्चा होणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीचे सहा उमेदवार आहेत. त्यात काँग्रेसचे दोन आहेत. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. सहा उमेदवार निवडून कसे आणायचे याचे नियोजन सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण,नितीन राऊत आणि सतेज पाटील यांच्यात आज बैठक झाली असून सहाव्या जागेबाबत काँग्रेस अजूनही ठाम असल्याची माहिती आहे. लवकरच याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर काँग्रेस चर्चा करणार आहे, अशी देखील माहिती आहे.