विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे देशात सुखरुप परतले

0
886

वाघा, दि. १ (पीसीबी) – पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे आज (शुक्रवार) आखेर मायदेशी सुखरुप परतले. वाघा बॉर्डरमार्गे अभिनंदन यांना भारतात आणण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. भारताने केलेल्या कारवाईमुळे चिडलेल्या पाकिस्तानने बुधवारी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. पण भारताने त्यांची विमाने परतवून लावली. भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले असून त्यावेळी आपले मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. यानंतर भारताने त्यांच्या सुटकेसाठी सर्वोपतरी प्रयत्न सुरु केले होते.

शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेसाठी अभिनंदन यांची सुटका करत असल्याची घोषणा केली होती. हे आमचे शांततेसाठीचे पहिले पाऊल आहे, असा कांगावा पाकिस्तान करीत असला तरी प्रत्यक्षात अमेरिका, सौदी अरेबियासह काही देशांनी आणलेल्या दबावामुळे पाकिस्तानला ही सुटका करणे भाग पडल्याचे स्पष्ट होत आहे. भारतानेही ही सुटका म्हणजे तडजोड नसून जोवर अतिरेक्यांवर ठोस कारवाई करीत नाही तोवर पाकिस्तानशी चर्चा नाही, असा ठाम पवित्रा घेतला होता. आखेर आज अभिनंदन यांची सुखरुप सुटका करण्यात आली. यामुळे देशाभरात आनंदाचे वातावरण आहे.