‘वायसीएम’मध्ये आमदार, खासदारांचा हस्तक्षेप नको ?

0
261

थर्ड आय – अविनाश चिलेकर –

महापालिकेचे यशवंतराव चव्हाण रुग्णालय (वायसीएम) हे सद्या केंद्रस्थानी आहे. ३० लाख लोकांपैकी ज्याच्या खिशात पैसा खुळखुळतो तो श्रीमंत वर्ग वगळला तर गोरगरिब सामान्य जनतेला जीवनदान देणारे हे एकमेव मोठे हॉस्पिटल. महापालिकेचे भोसरी, जिजामाता, आकुर्डी, तालेरा, नेत्र रुग्णालय ही छोटी रुग्णालयेसुध्दा शिलेदाराची भूमिका बजावतात. किमान पाचशे डॉक्टरांची फौज, हजारावर नर्स, वार्डबॉय असे किमान तीन-चार हजार कोरोना योध्दे गेले चार महिने कोरोना विरोधात अखंडपणे दिवसरात्र झटत आहेत. बिर्ला, ज्युपिटर, लोकमान्य, निरामय, स्टार, स्टर्लींग सह किमान पाऊनशे छोटी-मोठी खासगी अथवा ट्रस्टची सुसज्ज हॉस्पिटलस् शहरात आहेत. पण कामगार, चाळकरी, झोपडीधारकांना ती परवडत नाहीत. परिणाम ७० टक्के जनता ही महापालिकेच्या निःशुल्क अथवा नाममात्र दरातील उपचारासाठी धडपडत असते. सद्या शहरात रोज सरासरी एक हजार कोरोना पेशंट नव्याने सापडतात. त्यापैकी किमान ७०० पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती होतात. सुरवातीला हे प्रमाण कमी होते आता वेगाने वाढले आहे. त्याशिवाय शेजारचे जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर, मावळ, मुळशी या तालुक्यांतून तसेच नगर, बीड, लातूर, उस्मानबाद जिल्ह्यांतून लोक उपचारासाठी पिंपरी चिंचवड शहरात येतात. जे पुण्याच्या ससूनचे हाल तेच इथे वायसीएम चे आहेत. रुग्णांच्या तुलनेत डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय सगळेच कमी पडते. दुसरीकडे रुग्णांचे लोंढे येऊन धडकताहेत. हा समतोल राखणे अशक्य होत चालले आहे. हे होणार याची प्रशासनापासून सर्व राज्यकर्त्यांनाही पूर्ण कल्पना होती. आता प्रसंग मोठा बाका आहे. गेले चार महिने पूर्ण यंत्रणा मरमर राबते आहे. त्यामुळे मंडळी थकली आहेत. अशातच तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री एका वृध्द महिलेला दाखल करून घेण्यासाठी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे आले. जागा नसल्याने डॉक्टर आणि त्यांच्यात खडाजंगी झाली. छटापटी, धक्काबुक्की पर्यंत प्रकरण गेले. संबंधीत डॉक्टरांना शिवीगाळ, मारहाण केल्याचे सांगितले जाते. स्वतः वाघेरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. दरम्यान, या प्रकऱणामुळे दुसऱ्या दिवशी वायसीएम मधील सर्व डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले. नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली. काही संस्था संघटनांनी मध्यस्थी केली. आमदार, पालिकेचे पदाधिकारी यांनी चर्चा केली. यावेळी काही निवासी डॉक्टरांनी एक भूमिका घेतली ती मात्र आक्षेपार्ह वाटते. ‘वायसीएम च्या कारभारात आमदार, खासदार, नगरसेवकांचा हस्तक्षेप नको.’ सुज्ञास सांगणे न लगे, पण डॉक्टरांसारखे जाणकार लोकशाहीतील सूत्र नाकारत असतील तर ते गंभीर आहे. कुठेतरी त्यावर विचार केला पाहिजे.

डॉक्टरांनीसुध्दा संयम ठेवावा –
कोरोना काळातील वायसीएम मधील डॉक्टरांचे योगदान, त्यांची निरपेक्ष सेवा, कष्ट याबाबत निश्चितच कौतुक आहे. सर्व डॉक्टरांमुळे लोकांना जीवदान मिळाले, मिळते आहे. स्वतःच्या प्राणाची बाजी लावून कोरोनाला पराभूत करण्यासाठी सारे प्रयत्न करतात. जीवाची वा कुटुंबाची ते पर्वा करत नाहीत याबद्दल कोणाचेही दुमत नाही. अत्यंत कठीण परिस्थितीत काही लोकांनी पळ काढला, पण वायसीएमचे डॉक्टर खंबीरपणे उभे राहिले याचा शहरवासीयांना अभिमान आहे. पण एक लक्षात ठेवा, हे हॉस्पिटल, इथल्या सर्व सुविधा यासाठी शहरातीलच करदात्यांचा एक एक रुपया खर्च होतो. त्यासाठी नगरसेवक हे जनतेचे विश्वस्त म्हणून काम पाहतात. त्यामुळे त्यांचा मान ठेवलाच पाहिजे. वायसीएम हे काही खासगी हॉस्पिटल नाही. इथे जनतेचे विश्वस्त म्हणून नगरसेवक असो वा खासदार, आमदार त्यांचा शब्द महत्वाचा आहे आणि असलाच पाहिजे. अन्यथा लोकशाहीला अर्थ राहणार नाही. उपचारातले लोकप्रतिनिधींना काहीही कळत नाही. त्यात हस्तक्षेप नको असे म्हटले तर ठिक, पण आमच्या कारभारातच ढवळाढवळ नको, असे कोणीही डॉक्टर म्हणत असतील तर ते गैरलागू आहे. लोकप्रतिनिधी निवडूण आलेला असतो, त्यामुळे त्यांचा हस्तेक्षपच नको असे म्हणता येणार नाही. कोणाला कोणते उपचार करावेत ते नगरसेवक सांगणार नाहीत. ते काम अर्थातच डॉक्टर करतील. पण या कामासाठी काय कमी अधिक पाहिजे नको ते पुरविण्याचे काम नगरसेवकाकडेच येते. नगरसेवकांनी डॉक्टरांना पेशंटबाबत शिफारस करणे, सुचना देणे, विचारपूस करणे इथपर्यंत ठिक आहे. काही गुंड प्रवृत्तीचे नगरसेवक अतिरेक करतात, असे अनेक दाखले देता येतील. कामाचा ताण जसा डॉक्टरांवर आहे तसा नगरसेवकांवरही आहे. मात्र, सार्वजनिक कामात दोघांनीही संयम दाखवला पाहिजे. वायसीएम मध्ये यापूर्वी डॉक्टरांवर हल्ला, मारहाण असे अनेक प्रकार घडले. काही प्रकरणात तक्रार झाली काही परस्पर मिटवले गेले. नगरसेवक व डॉक्टर या दोघांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. वायसीएम मधील कोट्यवधींची साहित्य खरेदी, औषध खरेदी या विषयावर डॉक्टर-नगरसेवक यांचे संगनमत असते. ७० लाखाचे मशिन पावणे तीन कोटीला खरेदी करताना मतभेद नसतात.

संदीप वाघेरे प्रकरणातही राजकारण –
भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे हे काही गुंडा प्रवृत्तीचे नाहीत. त्यांच्या कामाची धडाडी आहे, गाजावाजा आहे. पिंपरी गाव परिसरात त्यांनी केलेली कामे आणि त्यांचा अफाट जनसंपर्क यामुळे त्यांना राजकीय शत्रु अनेक आहेत. थेट आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी पंगा घेणारे म्हणून त्यांची ओळख. आता या प्रकऱणात वाघेरे सापडले म्हणून भाजपमधील त्यांचे विरोधकसुध्दा जागे झाले. डॉक्टर मारहाण प्रकऱणात तथ्य असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, बेड्या ठोका. पण आता हे प्रकरण वेगळे वळण घेताना दिसते. भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके यांनी वाघेरे यांना शिस्तभंगाची नोटीस दिली. मुळात या प्रकरणात पक्षाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी नोटीस दिली तर ती नियमाला धरून होईल, ती लागू पडते. ढाके यांनी नोटीस दिली, ते कोणाच्या सांगण्यावरून केवळ एक सोपस्कर म्हणून. भाजपमध्ये शिस्तभंगाचे किती प्रकार झाले त्याची गणती करता येणार नाही. बेशिस्तीचे कितीतरी प्रकार महापालिका सभागृहात झाले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांना बेशुध्दपडे पर्यंत मारहाण झाली. दोन्ही आमदारांनी थेट पोलीस आयुक्त यांच्याकडे विनवणी केली, पण साधा गुन्हासुध्दा दाखल होऊ शकलेला नाही. तिथेच भाजपची चव गेली. कारण मारहाण कशामुळे झाली? हे चव्हाट्यावर आले तर १० कोटींच्या वाटपावरून हे कटू सत्य समोर येते. त्यात भाजपची नाचक्की होते. महापालिकेत सत्ता भाजपची पण नाचक्की होते तीसुध्दा भाजपचीच. एका नगरेसवकाचे प्रकऱणात भाजपची बेअब्रु झाली. सुसंस्कृत मंडळींचा हा पक्ष आता पूर्वीच्या काँग्रेसच्या वळणावर चालला आहे. सावरा अन्यथा पुढचा काळ कठीण आहे