वाढता कोरोना रोखण्यासाठी पुणे जिल्हा व महानगराचा मोठा निर्णय

0
398

पुणे, दि. १८ (पीसीबी) : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने पसरू लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणे जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रात प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. अशात केरळमधून पुणे शहरात येणाऱ्या नागरिकांना RT-PCR टेस्ट बंधनकारक असल्याचे आदेश देण्यात आले आहेत.

खरंतर, कोरोनाला रोखण्यासाठी आता पुन्हा लॉकडाऊन करणार का अशा चर्चांना उधाण आलं असताना पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी RT-PCR टेस्ट बंधनकारक केली आहे. इतकंच नाही तर पुण्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी हॉटेल्स, मॉल्स, मल्टिप्लेक्स आणि मंगल कार्यालयांना यांना इशारा दिला आहे. या सर्व ठिकाणी गर्दी टाळली जावी आणि कोरोना रोखण्यासाठीच्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे शेखर गायकवाड यांनी म्हटले आहे.पुण्यातील आस्थापने, मंगल कार्यालये आणि आस्थापनांमध्ये नियमांची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी स्वतंत्र पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही भरारी पथके सर्व ठिकाणी फिरून कारवाई करतील. याशिवाय, पुणे महानगरपालिकेकडून बाधित क्षेत्रातील हायरिस्क कॉन्टॅक्ट शोधून कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची मोहीम पुन्हा एकदा हाती घेण्यात आली आहे. मात्र, चाचण्यांपेक्षा लसीकरणाला अधिक प्राधान्य दिले जाईल.

पुण्यात लग्न समारंभांवर पुन्हा निर्बंध? प्रशासनाच्या हालचालींना वेग नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम सर्रास धाब्यावर बसवले जात असल्याने आता पुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात पुणे जिल्ह्यात लग्नसमारंभांवर (Wedding ceremony) पुन्हा निर्बंध लादले जाऊ शकतात. स्थानिक प्रशासनाकडून तशा जोरदार हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे. गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असताना पुणे जिल्हा हा हॉटस्पॉट बनला होता. तशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून यावेळी स्थानिक प्रशासनाकडून कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून लग्नसमारंभांवर पुन्हा एकदा निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.