वाकड येथे ट्रकचालकाला तीक्ष्ण हत्याराने वार करुन लुटले

0
358

वाकड, दि. २ (पीसीबी) – ट्रकचा टायर पंक्चर झाल्याचे पाहत असताना कारमधून आलेल्या दोघा चोरट्यांनी ट्रकचालकावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करुन त्याच्याजवळील साडेसहा हजार रुपयांची रोख जबरदस्तीने चोरुन नेली. ही घटना सोमवार (दि.१) रात्री साडेबाराच्या सुमारास बैंगलोर-मुंबई महामार्गावरील वाकड ब्रीजजवळ घडली.

राम रईस यादव (वय ३८, रा. न्हावाशेवा मुंबई) असे वार होवून जखमी झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी राम यादव हे त्यांच्या ताब्यातील ट्रक (क्र. एमएच/४३/वाय/९२९५) घेऊन मुंबई बैंगलोर महामार्गाने चालले होते. ते वाकड ब्रीजजवळ पोहचले असता त्यांना त्यांच्या ट्रकचा टायर पंक्चर झाल्याचे जानवले. यामुळे ते ट्रक थांबवून टायर पंक्चर झाल्याचे पाहत होते. इतक्यात पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या दोघा चोरट्यांनी राम यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले आणि त्यांच्या खीशातील साडेसहा हजारांची रोख जबरदस्तीने चोरुन पसार झाले. हिंजवडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.