वर्षभरात भारतातील ५००० कोट्यधीशांचा देशाला रामराम; विदेशात स्थलांतरित

0
734

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – गेल्या वर्षी तब्बल ५००० कोट्यधीश धनाढ्यांनी देशाला रामराम ठोकून परदेशात आपलं बस्तान बसवल्याचे एका अहवालात स्पष्ट झालं आहे. कमी ते मध्यम उत्पन्न गटात मोडणाऱ्या देशातील कोट्यधीश मोठ्या प्रमाणात देश सोडून विदेशात स्थलांतरित होत आहेत.

या अहवालनुसार सर्वाधिक धनाढ्य लोक देश सोडण्याचे प्रमाण चीनमध्ये आहे. चीनमध्ये मागच्या वर्षी १५,००० श्रीमंतांनी देश सोडला आहे. त्यानंतर या यादीत रशिया, भारत, युके, साऊथ आफ्रिका आणि ब्राझील या देशांचा नंबर लागतो. मायदेश सोडणारे सर्वाधिक श्रीमंत ऑस्ट्रेलियात बस्तान बसवत आहेत. गेल्या वर्षभरात जगभरातून १२,००० श्रीमंत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले आहेत. ऑस्ट्रेलियानंतर अमेरिका, कॅनेडा, ग्रीस आणि स्पेन या देशांना पसंती दिली जात आहे.

भारतात जितके श्रीमंत लोक देश सोडत आहेत त्याहून कैकपटीने जास्त लोक दरवर्षी उच्च उत्पन्न गटाचा भाग होत आहेत. यामुळेच भारत आता श्रीमंतांची खाण बनला आहे. त्याचवेळी भारतात आर्थिक विषमताही प्रचंड वाढते आहे. देशातील ४८ टक्के संपत्ती काही उद्योगपतींच्या हातात आहे, तर उरलेली ५२ टक्के संपत्ती सामान्य लोकांच्या हातात आहे. ही परिस्थिती चिंताजनक असल्याचं बोललं जातं आहे.