वंचित बहुजन आघाडीला ६ जागा देण्याची काँग्रेस–राष्ट्रवादीची तयारी ?  

0
962

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – काँग्रेस-राष्ट्रवादीचे  नेते आणि भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये नुकतीच चर्चा झाली. यावेळी आघाडीच्या नेत्यांनी  वंचित बहुजन  आघाडीला  ६ जागा देण्याची तयारी  दर्शवली आहे.  सुरुवातीला ६ जागांच्या मागणीनंतरही प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या किमान १२ आणि विधानसभेच्या  २४ जगांचा आग्रह धरल्याची चर्चा आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या निवासस्थानी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेस नेते आणि विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ आदी नेते उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली होती.  आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत येण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, एमआयएमला सोबत घेण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोध केला  होता. त्यानंतर एमआयएम नको असेल, तर मी आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, असे ओवेसी यांनी म्हटले होते.  त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमधील महाआघाडीचा मार्ग मोकळा झाला होता.