लोहगावमध्ये कबुतराची अंडी खाऊन आठव्या मजल्यावरुन उडी मारुन तरूणाची आत्महत्या

0
725

पुणे, दि. २० (पीसीबी) – एका तरुणाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना लोहगाव परिसरात घडली आहे. या तरुणाने आत्महत्येपूर्वी मद्य प्राशन करून कबुतराच्या आठ अंड्यांचे ऑमलेट करुन खाल्लं होते. त्यानंतर कबुतराची अंडी आणि नशा याचा विपरीत परिणाम होऊन त्याने नशेतच थेट आठव्या मजल्यावरुन उडी मारल्याचे सांगितले जात आहे.

अर्णव मुखोपाध्याय (वय ३२ मुळ रा. कोलकाता) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो पुण्यात व्होडाफोन कंपनीत नोकरीला  होता.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी फ्लॅटच्या खिडकीमध्ये कबुतरांनी ८ अंडी घातल्याचे त्याला समजले.  त्यानंतर ती अंडी काढून त्यांचे ऑमलेट बनवले. कबुतराची अंडी खाण्यास त्याला पत्नीने विरोधही केला होता. मात्र अर्णवने तिचे काहीच ऐकले नाही.  काहीवेळानंतर तो विचित्र वागू व बोलू लागला. माझ्या अंगात कबुतराचे भूत आले आहे, असे म्हणून तो घरातच पळू लागला. त्याच्या अशा वागण्याने घाबरलेल्या पत्नीने त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र, अचानक त्याने फ्लॅटच्या गॅलरीचा दरवाजा उघडून आठव्या मजल्यावरुन उडी मारली.  खाली पार्किंगमध्ये असलेल्या एका चारचाकी गाडीवर तो पडला, या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी अर्णवच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. पुढील तपास विमाननगर पोलीस करीत आहेत.