लोखंडी तारेचा क्वाईल बंडल अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू

0
264

आळंदी, दि. १३ (पीसीबी) – कंपनीत काम करताना एका कामगाराच्या अंगावर लोखंडी तारेचा क्वाईल बंडल पडला. त्यात गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी कामगारांना सुरक्षा साधने न पुरवल्याचा ठपका ठेवत कंपनी मालक आणि सुपर वायझर यांच्या विरोधात निष्काळजीपणे मृत्यू घडवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 26 ऑगस्ट 2019 रोजी च-होली खुर्द येथील तारिणी स्टील प्रा ली या कंपनीत घडला. त्याबाबत सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्या प्रकरणाचा तपास करून 19 महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनी मालक अभिषेक अगरवाल (रा. कॅम्प, पुणे), सुपरवायझर किशोर देविदास कुलकर्णी (रा. वडगाव रोड, च-होली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार दत्तात्रय टोके यांनी सोमवारी (दि. 12 एप्रिल 2021) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मृत्युंजय लंबोदर बेहरा (वय 40, रा. वडगाव रोड, च-होली) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मृत्युंजय हे आरोपी अभिषेक याच्या तारिणी स्टील प्रा ली या कंपनीत काम करत होते. कंपनीतील कामगारांना सुरक्षा साधने आरोपींनी पुरवली नाहीत. 26 ऑगस्ट 2019 रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास कंपनीतील क्वाईल बंडल संपल्याने मृत्युंजय क्वाईल बंडल लावत होते. क्रेनच्या सहाय्याने बंडल उचलून ते लावण्याचे काम करत असताना क्वाईलला लावलेली तार तुटली आणि मृत्युंजय यांच्या अंगावर तारेचा बंडल पडला. त्यात मृत्युंजय यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा 27 ऑगस्ट 2019 रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्या घटनेचा तपास केल्यानंतर याबाबत निष्कळजीपणे मृत्यू घडवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.