लोकसभेच्या निकालाआधीच सुजय विखे पाटील खासदार; लग्नपत्रिका व्हायरल

0
632

अहमदनगर, दि. २ (पीसीबी) – अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या समर्थकांना सुजय यांना खासदार म्हणून पाहण्याची भलतीच घाई झाली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच एका लग्नपत्रिकेत त्यांचा उल्लेख ‘खासदार’ असा करण्यात आला आहे. त्यामुळं आश्चर्य व्यक्त होत आहे.

गावाकडच्या लग्न सोहळ्यांमध्ये स्थानिक आमदार, खासदार व नेते मंडळींची हजेरी ही प्रतिष्ठेची बाब समजली जाते. अनेक लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघांतील महत्त्वाच्या लग्न सोहळ्यांना आवर्जून उपस्थित राहत असतात. त्यामुळं लग्नपत्रिकेमध्येच ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून त्यांची नावे छापली जातात. या प्रथेप्रमाणेच नगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील एका लग्नपत्रिकेत सुजय विखे यांचं नाव छापण्यात आलं आहे. मात्र, ते छापताना त्यांचा उल्लेख ‘संसद सदस्य भारत सरकार’ असा करण्यात आला आहे. ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

राज्याचे माजी विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र असलेल्या सुजय यांनी यावेळी भाजपकडून निवडणूक लढविली. राष्ट्रवादी काँग्रेसनंही संग्राम जगताप यांना मैदानात उतरवून सुजय यांना आव्हान दिलं होतं. त्यामुळं संपूर्ण राज्याच्या नजरा या मतदारसंघातील निकालाकडं लागल्या आहेत. मात्र, विखे समर्थकांनी आधीच आपल्या पद्धतीनं निवडणुकीचा निकाल लावून टाकला आहे.