लोकसभा पराभवावर युवक काँग्रेसच्या वतीने मुंबईत ३ जूनला खुली चर्चा

0
368

मुंबई, दि. २९ (पीसीबी) –  लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर  काँग्रेसच्या अनेक प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर महाराष्ट्रातही पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी युवक काँग्रेसकडून आजी-माजी पदाधिकाऱ्यांची ३ जूनला खुली चर्चा आयोजित  केली आहे.

मुंबईतील काँग्रेस कार्यालयात ही बैठक बोलावण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष नेमका कुठे कमी पडला? यावर खुली चर्चा व्हावी यासाठी बैठक बोलावल्याचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

लोकसभेचा निकाल हा काँग्रेससाठी धक्कादायक आहे. परंतु हा जनादेश आपण नम्रपणे स्वीकारला पाहिजे. राज्यात आपण कुठे कमी पडलो याची खुली चर्चा व परीक्षण मोकळ्या वातावरणात व्हावे आणि चुकांपासून धडा घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनिती आखावी. तसेच युवक काँग्रेसने कुठले कार्यक्रम राबवावे, या उद्देशाने  या चर्चेचे आयोजन केले आहे, असे सत्यजीत तांबे यांनी  त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहीले आहे.

युवक काँग्रेस तसेच विद्यार्थी काँग्रेसच्या नव्या-जुन्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. याच बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी युवक काँग्रेसच्या कामाच्या रणनिती देखील ठरवण्यात येईल, असे   त्यांनी सांगितले.