लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरूवारी मतदान; प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

0
601

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात मतदारसंघात गुरूवारी (दि. ११) मतदान होणार आहे.  तर प्रचाराचा आज (मंगळवार) शेवटचा दिवस असून सायंकाळी ६ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मतदानाची सर्व तयारी झाली असून निवडणूक यंत्रणेकडून तयारीवर शेवटचा हात फिरवला जात आहे.      

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांत मतदान होणार आहे. त्याआधी  महायुती आणि महा आघाडीच्या उमेदवारांनी सर्वसामान्यांच्या भेटी, सभा घेऊन प्रचार केला.

नितीन गडकरी, माणिकराव ठाकरे, हंसराज अहिर, नाना पटोले यासारख्या दिग्गज नेत्यांसह ११६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे. चार जागांवर भाजप आणि काँग्रेसचा थेट सामना होणार आहे, तर दोन जागांवर काँग्रेस आणि शिवसेना  यांच्यात लढत होणार आहे.

दरम्यान, गेल्या आठ दिवसांत विदर्भातील होरपळून टाकणाऱ्या उन्हात उमेदवारांनी झंझावती प्रचार करून राजकीय वातावरण तापवले होते. पंतप्रधान मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभा झाला. चटके बसणाऱ्या उन्हात नेत्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. आज प्रचाराच्या तोफा थंडावणार असून गोपनीय बैठकींना जोर येणार आहे.