लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा आत्महत्येचा इशारा; आमदार लंकेंकडे रोख

0
431

पारनेर, दि.२० (पीसीबी) : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या एका आँडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली असून पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या व्यापाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला आहे. यात त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा तेथील आमदार निलेश लंके यांच्यावर असल्याचे त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगातून दिसून येते.

आत्महत्या केलेल्या वनअधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून देवरे यांनी पत्र लिहिलं आहे. मी लवकरच तुझ्या सोबत येत असल्याचे सांगत महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतो. लोकप्रतिनिधी कसा त्रास देतात. आणि वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचा उल्लेख त्यांनी केला आहे. कोवीड लसीकरणावरुन आमदार निलेश लंके यांनी एका आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. नंतर ती तक्रार मागे घेण्यात आली. याचा उल्लेखही देवरे यांनी लंके यांचे नाव न घेता केला आहे. आपल्या विरुद्ध विधीमंडळात प्रश्न मांडणे, दमदाटी करणे, मी मारहाण केल्याची तक्रार माझ्या गाडीच्या चालकाकडून लिहून घेणं, अँट्रोसिटीची तक्रार दाखल करण्याची धमकी देणे असे अनेक प्रकार घडल्याने देवरे यांनी क्लिपमध्ये नमूद केले आहे. आपल्या मुलांकडे पाहून आत्महत्या करण्याचे पाऊल उचलण्याचा विचार कधीकधी येतो. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याने हे पाऊल उचल्याचे देवरे यांनी म्हटलं आहे.

प्रिय दीपाली चव्हाण घाबरु नकोस मी लवकरच तुझ्या वाटेवर तुला सोबत करण्यासाठी येत आहे. त्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही. तुझ्या वाटेवर दिसते एक आशेची उजळलेली पणती बाकी सारा अंधार दिव्याखालचा. खर तर तु या रस्त्यावरुन गेली तेव्हा मी सूसाईट नोट लिहून रडत कुढत जगणाऱ्या साऱ्या मैत्रिणींना हक्कानं खडसावले होतं, फुलराणी बना तुला शिकवीन चांगला धडा असे पालुपद गा मी पण तेच पालूपद गात होते. पण लक्षात आले त्याचे परिणाम. किती जणांना धडा शिकवायचा पण या चिमुकल्या पंख्यात आताा त्राण राहिले नाही.

तत्वांना मुरड घालून जगता येत नाही. त्यांचे हुजरी करत तळवे चाटता येत नाही. लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचता येत नाही, त्यांनी थूंकलेलं मला चाटत येत नाही. उकिरड्यावर उभ्या असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या धिंडी मला रोखता येत नाही. अन् वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडित गाठता येत नाही. त्यांनी तर खिंडित साहाय्य पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविण्याचे काम केलं. ठिक आहे लोकप्रतिनिधी आणि आपण एक रथ आणि दोन चाक. पण आपल्या चाकांना जरा गती घेतली की आपला घात निश्चित समजावा.