लेस्टर सिटीने पटकावला एफए करंडक

0
237

लंडन, दि.१६ (पीसीबी) : वर्षभराच्या चाहत्यांच्या विरहानंतर सर्वाधिक चाहत्यांसमोर झालेल्या एफए करंडक अंतिम सामन्यात लिसेस्टर सिटी संघाने विजेतेपद मिळविले. स्ट्रायकर यौरी टिएलेमान्स याने लांबवरून मारलेल्या किकने जाळीचा अचूक वेध घेतला आणि याच एकमात्र गोलच्या आघाडीवर लेस्टर सिटीने वेम्बले येथे झालेल्या अंतिम लढतीत चेल्सीचा १-० असा पराभव केला.

आतापर्यंत लेस्टरने तीन वेळा एफए करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. पण, तीनही वेळा त्यांना विजेतेपदाने हुलकावणी दिली. त्यांनी १९६९ मध्ये अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर तब्बल ५२ वर्षांनी त्यांनी अंतिम फेरी गाठली. त्यांचे विजेतेपदही खास ठरले. टिएलेमान्स याने नोंदवलेला गोल स्पर्धेच्या १४९ वर्षाच्या इतिहासातील सर्वोत्तम ठरला.

सामन्यातील गोल नाट्य हे अखेरच्या टप्प्यात रंगले. लेस्टर सिटीच्या वेस मॉर्गन याने सामन्याच्या ८९व्या मिनिटाला म्हणजे सामना संपण्यास केवळ एक मिनिट शिल्लक असताना आपल्याच संघावर गोल केला. त्या वेळी सामना अतिरिक्त वेळेत जाणार असा चेल्सीचा समज झाला. पण, लेस्टरने ‘वार’ची मदत घेतली. यात पंचांनी खेळाडू ऑफसाईड असल्याचा निर्णय दिला आणि लिसेस्टरच्या विजयावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले.

प्रेक्षकांची उपस्थिती
कोविड १९च्या संकटाने गेले वर्षभर फुटबॉल सामने प्रेक्षकांशिवाय होत आहेत. पण, या अंतिम सामन्यासाठी मर्यादित प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. तरी देखिल ही उपस्थिती गेल्या दीड वर्षातील सर्वाधिक होती. एकूण ९० हजार क्षमतेच्या वेम्बले स्टेडियमवर २१ हजार फुटबॉल चाहत्यांनी उपस्थिती लावली होती.

पूर्वार्ध चेल्सीचा
सामन्याच्या पूर्वार्धात चेल्सीचे वर्चस्व होते. चेंडूवर सर्वाधिक ताबा मिळवूनही त्यांना गोल करण्याच्या फार काही संधी निर्माण करता आल्या नाहीत. सामन्याच्या ३४व्या मिनिटाा लेस्टरचा मुख्य बचावपटू जॉनी इव्हान्स जखमी होऊन मैदानाबाहेर गेला, तरी त्याचा फायदा चेल्सीला उठवता आला नाही.

प्रेक्षणीय गोल
पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर उत्तरार्धात फार काही वेगळे चित्र नव्हते. बरोबरीची कोंडी सुटण्याची शक्यता दिसत नव्हती. अशा वेळी सामन्याच्या ६३व्या मिनिटाला टिएलमान्स याने नोंदवलेला गोल स्पर्धेच्या १४९ वर्षाच्या इतिहासात प्रेक्षणीय ठरला. त्याने मैदानाच्या मधून चेंडूचा ताबा घेतला आणि कूच केले. गोलकक्षाच्या अलिकडून टिएलमान्स याने थेट किक मारली आणि गोलरक्षक अरिझाबालागा याने डाईव्ह मारून गोल अडविण्याचा केलेला प्रयत्न फोल ठरला.

त्यानंतर, चेल्सीकडून एकामागून एक प्रयत्न करण्यात आले. पण, लेस्टरचा गोलरक्षक कॅस्पर श्मेईशेल याने त्यांचे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडले. सर्वात प्रथम राखीव खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या बेन चिलवेल आणि नंतर मॅसन माऊंट यांचे प्रयत्न फोल ठरले. त्यानंतर सामन्याचा एक मिनिट शिल्लक असताना चिलवेलची एक किक लेस्टरच्या मॉर्गनला धडकून जाळीमध्ये गेली. चेल्सीला बरोबरी राखल्याचा आनंद झाला. पण, लेस्टरने ‘वार’ची मदत घेतली. तेव्हा चिलवेल ऑफसाईड असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सामना संपल्याची शिट्टी वाजल्यावर लेस्टरच्या खेळाडूंच्या जल्लोषाला उधाण आले.

चेल्सीची ही संधी हुकली असली, तरी ते २९ मे रोजी चॅंपियन्स लीगची अंतिम फेरी खेळणार आहेत. त्यांची गाठ मॅंचेस्टर सिटीशी पडणार आहे.