ऑलिंपिक पात्र मल्ल युरोपात

0
422

नवी दिल्ली, दि.१६ (पसिबी) : देशातील वाढत जाणारी कोविड १९ संसर्गाची समस्या लक्षात घेता भारतीय कुस्तीगीर महासंघाने ऑलिंपिक पात्र सहा मल्लांचे सोनीपत येथील शिबीर रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता या मल्लांना सराव आणि स्पर्धात्मक अनुभवासाठी युरोपातील विविध शहरात पाठवले जाणार असून, मल्लांना त्यांचा आवडीचा सराव सहकारी नेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या आधीच्या सूचनेनुार आठही ऑलिंपिक पात्र मल्ल बहालगढ येथील साईच्या केंद्रावर मंगळवारी दाखल झाले होते. मात्र, एकूण परिस्थिती लक्षात घेता महासंघाने त्यांच्या कार्यक्रमात बदल केला असून, आता त्यांना मे महिन्याच्या अखेरीस वॉरसॉ येथे पाठविण्यात येणार आहे.

पोलंडची राजधानी असलेल्या या शहरात ऑलिंपिकपूर्व जागितक कुस्ती महासंघाची अखेरची मानांकन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील सहभागाने त्यांना मानांकन गुण मिळतील आणि त्याचा त्यांना ऑलिंपिक ड्रॉसाठी फायदा होईल असा या मागचा विचार आहे. भारतीय कुस्तीगीर महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर म्हणाले,’आम्ही या सहा मल्लांचे बलागढ येथे शिबिर आयोजित केले होते. अर्थात येथे आल्यावर त्यांना १४ दिवसाच्या विगीकरणाच्या नियमामुळे सराव करता येणार नव्हता. त्यामुळे आम्ही त्यांना त्यांच्या नेहमीच्या आखाड्यात सराव करण्याच्या सूचना केल्या आणि आता ते मल्ल तेथूनच पोलंडला रवाना होतील.’

या सहाही मल्लांना सरावासाठी त्यांचे आवडीचा सहकारी मल्ल नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर विनेश फोगट, बजरंग पुनिया, रवी दहिया आणि दीपक पुनिया या मल्लांना त्यांचे वैयक्तिक प्रशिक्षकही घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती तोमर यांनी दिली. भारतीय खेळाडूंना स्पर्धेपूर्वी तेथील सुविधांचा उपयोग करून द्यावा या विषयी पोलंडशी पत्रव्यवहारही करण्यात आली आहे.

पोलंड येथील स्पर्धेनंतर भारतीय मल्ल प्रशिक्षणासाठी हंगेरीला जातील. त्यानंतर ते तुर्कीला सराव करतील आणि तेथे २५ ते २७ जून दरम्यान होणाऱ्या यासार डोगू स्पर्धेत सहभागी होतील. हा सगळा कार्यक्रम आटोपून भारतीय मल्ल जुलैत मायदेशी परततील.

विनेश आपले हंगेरीचे प्रशिक्षक वॉलर अकोस यांच्याबरोबर यापूर्वीच परदेशात सरावासाठी गेली आहे. ती तेथूनच पोलंडला येईल. एकूण ४० दिवसाच्या या कार्यक्रमात गुडघादुखीने बेजार असलेले सोनम मलिक (६२ किलो) आणि सुमीत (१२५ किलो) सहभागी होणार का याविषयी अजून निश्चित माहिती नाही.