लिफ्टमध्ये अडकून पुण्यातील ७ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

0
1439

पुणे, दि. २१ (पीसीबी) – लिफ्टमध्ये अडकल्याने एका ७ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.  ही घटना शनिवारी (दि. २०) पुण्यातील मोमीनपुरा येथील झोहरा कॉम्प्लेक्समध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नशरा रेहमान खान (वय ७) असे मृत्यु झालेल्या चिमुरडीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाजीमा रेहमान खान यांनी नशराला मोमीनपुरा येथील झोहरा कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या आजीकडे सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सोडले होते. त्यानंतर नशरा ही दिवसभर घरीच खेळत होती. मात्र पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास नशरा ही बाहेर खाऊ आणण्यासाठी आजीकडून पैसे घेऊन लिफ्टमध्ये गेली. यावेळी आजीला अचानक ओरडण्याचा आवाज यायला लागला. त्यामुळे आजीने धावत लिफ्टजवळ जाताच, नशरा लिफ्टमद्ये अडकल्याचे दिसून आले.

यानंतर स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करुन नशराची सुटका केली. यानंतर नशराला जवळच्या रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. पोलिस तपास करत आहेत.