‘लाच लुचपत विभागाची’ धडाकेबाज कारवाई; एकाच दिवशी ३ कारनामे केले उघड; बडे अधिकारी पकडले रंगेहाथ

0
406

पुणे, दि.०१ (पीसीबी) : एकाच दिवशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तिहेरी कारवाई केली आहे. तळेगाव दाभाडे येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी, उद्यान पर्यवेक्षक यांना ९ लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर शिरुरमधील सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील सहकार अधिकार्‍यास १५ हजारांची लाच घेताना पकडले. तसेच कौटुंबिक न्यायालयातील खटल्यात १० हजारांची लाच घेताना एका वकिलाला सापळा रचून रंगेहाथ पकडले. मुख्याधिकारी शाम लक्ष्मणराव पोशेट्टी (वय ४४, रा. खारघर, नवी मुंबई) आणि उद्यान पर्यवेक्षक विशाल अंकुश मिंड (वय ३३, रा. अथेना सोसायटी, तळेगाव दाभाडे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार यांच्या कंपनीस तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत काम मिळाले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर चार कामाची बिलांची रक्कम काढण्यासाठी विशाल मिंड याने ९ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याला मुख्याधिकारी शाम पोशेट्टी यांनी सहमती दर्शवून लाच मागण्यास सहाय्य केले. या प्रकरणात ५ ते ६ वेळा पडताळणी करण्यात आली. मात्र, सापळा कारवाई होऊ शकली नाही. लाचेची मागणी करण्यात आली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याधिकारी शाम पोशेट्टी याला ताब्यात घेण्यात आले आहे.

दुसर्‍या कारवाईत १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहकार अधिकारी शिवाजी महादु गव्हाणे (वय ५६, सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय) याला रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदार यांचे सावकारी परवाना नुतनीकरणासाठी २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करताना गव्हाणे याने १५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्वीकारताना शिवाजी गव्हाणे याला पकडण्यात आले.

तिसर्‍या कारवाईत एका वकिलाला १० हजार रुपये लाच घेताना सापळा रचून पकडण्यात आले. हरिकिशन श्रीरामजी सोनी (वय ५७) असे या वकिलाचे नाव आहे. तक्रारदार महिलेचा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा सुरु आहे. या खटल्यात शासनाने सोनी याची वकील म्हणून नेमणूक केली होती. त्यात सोनी याने तक्रारदार महिलेकडे २० हजार रुपयांची लाच मागितली. महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्याची पडताळणी करताना तडजोडीअंती सोनी याने १० हजार रुपये लाच घेण्यास अनुमती दर्शविली. त्यानुसार सापळा रचून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हरिकिशन सोनी याला तक्रारदाराकडून १० हजार रुपये लाच घेताना पकडले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.