लाचखोर पोलीस अधिकारी रात्रीच्या अंधारात चोरासारखा लपतछपत पळाला… सोमाटणे येथील घटनेमुळे गावकऱ्यांची करमणूक

0
319

सोमाटणे, दि. ३० (पीसीबी) रात्रीचे साडेदहा वाजतात एक पोलीस अधिकारी शिरगाव सोमाटणे रस्त्याने पळत सुटतो, पायात ना बूट ना चप्पल, प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत, काही तरुण मुलांनी हटकल्यास काहीच सांगत नाही. गाडी काढा… गाडी काढा… असे सांगतो आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत एक अनोळखी गाडीत बसून जातो. हे वाचताना जरी चित्रपटाच्या स्टोरी सारखे वाटत असले तरी यातील शब्द ना शब्द खरा आहे. कारण २० हजाराची लाच घेताना रंगे हाथ सापडला आणि नंतर चोरासारखा लपतछपत पळून जाणारा तो अधिकारी होता.

याविषयी अधिक माहिती अशी की बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास काही तरुण आपल्या घरासमोर हवेला बसले असताना त्यांना शिरगाव सोमाटने रस्त्याने एक तीन स्टार असलेला पोलीस अधिकारी प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत पळताना दिसला. त्यामुळे कुतुहुलापोटी हटकले असता त्या अधिकाऱ्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्या तरुणांनी पाणी विचारले असता, मला पाणी नको पण मला गाडीने पुढे सोडा, अशी विनंती केली. त्या पोलीस अधिकाऱ्याची हालात पाहून तरुणही काही प्रमाणात घाबरले. हे काय प्रकरण आहे त्यांनाही समजेना. ज्यांना सारी लोक घाबरून जातात आज तेच घाबरले आहेत, म्हणून ते तरुण चैकशी करतात. तुम्ही कोण, कोणत्या पोलिस ठाण्यात असता काय झाले आहे का घाबरलात,हा संवाद सुरू असतानाच एक पत्रकार आणि एक दुसरा पोलिस तिथे पोचतात. हे पत्रकार आहेत, असे ऐकताच तो पोलीस अधिकारी अंधाराचा फायदा घेत धुम ठाकतो.

काही वेळाने एक मारुती सुझुकी रिट्झ गाडीत बसून तो निघून जातो. हे सर्व नाट्य मोजून पंधरा ते वीस मिनिटे घडते परंतु सकाळी सर्वांच्या मनात एकच कुतुहुल थैमान घालत आहे. तो पोलीस अधिकारी कोण ? अधिकारी असून इतक्या घाबरलेल्या अवस्थेत का? पत्रकार आल्यावर नाहीसा का झाला?अधिकारी असून पायी बिना बुट, चप्पल,पळत का होता?ती अनोळखी गाडी कोणाची होती? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्री उर्से टोल नाक्यावर लाच लुचपत खात्याची धाड पडली त्याचा आणि याचा काही संबंध आहे काय?अशा एक ना अनेक अनुत्तरित प्रश्नांनी सोमाटने येथील लोकांच्या व त्या तरुणांच्या मनात मोठ्या प्रमाणात थैमान घालत होते. नंतर समजते टोल नाक्यावर लाच घेणारा तोच तो अधिकारी होता.