लहान मुलांचे अपहरणकर्ते समजून साधूंना जबर मारहाण; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

0
295

मध्यप्रदेश, दि.२०(पीसीबी) : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात लहान मुलांचे अपहरणकर्ते समजून दोन साधूंना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. साधूंना मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेशातील या घटनेने महाराष्ट्रातील पालघर घटनेची आठवण करुन दिली आहे. एप्रिल २०२० रोजी पालघरमध्ये चोर असल्याच्या संशयावरुन दोन साधूंची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली होती.

मध्य प्रदेशातील हे दोन साधू इंदोरच्या दिशेने प्रवास करत होते. यावेळी काही लहान मुलांकडे त्यांनी पुढील रस्त्यासंबंधी चौकशी केली. यावेळी मुलं साधूंना घाबरली आणि तिथून पळून गेली. काही वेळाने तिथे जमाव आला आणि हे साधू लहान मुलांचे अपहरणकर्ते असल्याचं समजत मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी पिठमपूर पोलिसांच्या हवाली करण्यात आलं.

“काही लोकांनी साधूंना मारहाण केली. व्हिडीओच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. पोलीस यासंबंधी सर्व तपास करणार असून मारहाणीचं नेमकं कारण काय याची माहिती मिळवत आहे,” अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक देवेंद्र पाटीदार यांनी दिली आहे.
दरम्यान पालघरमधील साधूंच्या झुंडबळीप्रकरणी सीआयडीने १२६ आरोपींविरोधात चार्जशीट दाखल केली आहे. यामधील ८९ जणांना नंतर जामीन देण्यात आला.