लष्करी नव्हे, ही तर दहशतवादविरोधी कारवाई; सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

0
846

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोटमध्ये आज (मंगळवार) केलेल्या एअर स्ट्राइकनंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत दहशतवादविरोधी कारवायांबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी बालाकोटमध्ये केलेली कारवाई ही लष्करी नव्हे, तर दहशतवादविरोधी कारवाई होती, असा सूर सर्व पक्षीय नेत्यांनी काढला.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आज एअर स्ट्राइक करून ‘जैश’च्या  दहशतवादी तळ उद्‌ध्वस्त केले. त्यामुळे दहशतवाद्यांविरोधात ही मोठी कारवाई मानली जात आहे.  या दिवशी पहाटे साडेतीन वाजता भारतीय हवाई दलाचे १२ मिराज विमाने पीओके आणि खैबर पख्तून या भागात घुसले आणि त्यांनी सुमारे ३५० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

दरम्यान, काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद म्हणाले, सर्वांनी सुरक्षा रक्षकांच्या या कारवाईचे कौतुक केले आहे. दहशतवादाविरोधात सर्व पक्ष सुरक्षा रक्षकांच्या सोबत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही यशस्वी कारवाई होती. यामध्ये दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांचे तळ यशस्वीरित्या उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.