लग्नाचे अमिश दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वर्गमित्रास अटक

0
338

काळेवाडी, दि. २४ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून वर्गमित्राने तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तिने लग्नाबद्दल विचारणा केली असता तिला मारहाण केली. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. निगडी, काळेवाडी, पिंपरी या ठिकाणी हा प्रकार घडला.

राजकुमार सिध्दप्पा नागराळी (वय 25, रा. महात्मा फुले नगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. पीडित तरुणीने शनिवारी (दि. 23) याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी तरुणीचा वर्गमित्र आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त तो फिर्यादी तरुणीला निगडी परिसरातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तसेच आरोपी राजकुमारने मित्राचे ओळखपत्र दाखवून हॉटेलमधील रुम बुक केली. “तू मला येथे का घेऊन आला आहेस’, अशी फिर्यादी तरुणीने विचारणा केली असता आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तेथे फिर्यादी तरुणीच्या इच्छेविरूद्ध जबरदस्तीने आरोपीने शारीरिक संबंध केले. तसेच आरोपीने फिर्यादी तरुणीचा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तसेच फ्लॅट भाड्याने घेऊन नवरा बायकोसारखे राहून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादी तरुणीने लग्लाबद्दल विचारले असता आरोपीने त्यांना हाताने मारहाण केली. याबाबत पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.