रोहित शर्माने तो खराब फटका मारला आणि…

0
447

ब्रिस्बेन,दि.१६(पीसीबी) : रोहित शर्माने खराब फटका खेळून आपली विकेट गमावली. यामुळे चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ दुसऱ्या दिवशी बॅकफुटवर गेला. पावसामुळे खेळ लवकर थांबविण्यात आला. त्या वेळी भारताच्या २ बाद ६२ धावा झाल्या होत्या. तत्पूर्वी, भारताने ऑस्ट्रेलियाला ३६९ धावांत रोखण्यात यश मिळवले.

गॅबावर सुरू असलेल्या या लढतीत भारताची पहिल्या डावात निराशाजनक सुरुवात झाली. शुभमन गिल सात धावांवर माघारी परतला. यानंतर रोहित शर्माने चेतेश्वर पुजाराच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ४३ भागीदारी रचली. सारे काही सुरळीत सुरू होते. पुजारा आपल्या नेहमीच्या शैलीने संथपणे खेळत होता, तर धावफलक हालता ठेवण्याचे काम रोहित शर्मा करीत होता. मात्र, एक खराब फटका मारून तो बाद झाला. शंभरावा कसोटी सामना खेळत असलेल्या नॅथन लायनने स्टार्ककरवी झेल बाद केले. रोहितने ७४ चेंडूंत ६ चौकारांसह ४४ धावा केल्या. यानंतर जोरदार पावसामुळे चहापानानंतर खेळ होऊ शकला नाही. खेळ थांबला तेव्हा चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे मैदानात होते. ढगाळ वातावरणात भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार आहे. भारतीय संघ अद्याप ३०७ धावांनी पिछाडीवर आहे.

तत्पूर्वी, भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित पाच फलंदाजांना ९५ धावांत रोखण्यात यश मिळवले. टिम पेन आणि कॅमेरून ग्रीनने ५ बाद २७४ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. अर्धशतकानंतर पेनला शार्दूल ठाकूरने बाद केले, तर पुढच्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरने ग्रीनचा त्रिफळा उडविला. ग्रीन-पेन जोडीने सहाव्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचली. तळाच्या मिचेल स्टार्क आणि नॅथन लायनने अनुक्रमे २० आणि २४ धावा जोडल्याने ऑस्ट्रेलियाला साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. भारताकडून टी. नटराजन, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया – पहिला डाव – ११५.२ षटकांत सर्वबाद ३६९ (मार्नस लबुशेन १०८, टिम पेन ५०, मॅथ्यू वेड ४५, कॅमेरून ग्रीन ४७, टी. नटराजन ३-७८, शार्दूल ठाकूर ३-९४, वॉशिंग्टन सुंदर ३-८९, महंमद सिराज १-७७) वि. भारत – पहिला डाव – २६ षटकांत २ बाद ६२ (रोहित शर्मा ४४, शुभमन गिल ७, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ८, अजिंक्य रहाणे खेळत आहे २, पॅट कमिन्स १-२२, नॅथन लायन १-१०).