रोजगारात महाराष्ट्र मागे होता तो पहिल्या क्रमांकावर आणला – मुख्यमंत्री

0
521

मुंबई, दि. १० (पीसीबी) – यापूर्वी पंधरा वर्षांच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये रोजगारात महाराष्ट्र मागे होता तो गेल्या पाच वर्षांत आम्ही पहिल्या क्रमांकावर आणला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे राम सातपुते या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचे सकल उत्पन्न आधी १६ लाख कोटी रुपये होते आज ते २६ लाख कोटी झाले आहे. आमच्या सरकारने राज्याच्या तिजोरीत १० लाख कोटी रुपयांची भर टाकली आहे. पाच वर्षांपूर्वी शिक्षणात महाराष्ट्र १८व्या क्रमांकावर होता तो आता तिसऱ्या क्रमांकावर आणला. आरोग्यात महाराष्ट्र ६ व्या क्रमांकावर होता तो तिसऱ्या क्रमांकावर आणला. उद्योगात महाराष्ट्र मागे गेला होता तो पहिल्या क्रमांकावर आणला. गुंतवणूकीत आणि रोजगारात महाराष्ट्र मागे होता तो ही पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे.

पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्रातील जनतेची केवळ दिशाभूल करण्याचे काम केले. गेल्या पाच वर्षांत आम्ही राज्यातील जनतेच्या सर्व समस्या सोडवल्या असा दावा करणार नाही. मात्र, पंधरा वर्षांतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कामाच्या तुलनेत गेल्या पाच वर्षांत आम्ही त्यांच्यापेक्षा दुप्पट कामे केली आहेत, हा दावा आम्ही निश्चित करु शकतो असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

फडणवीस म्हणाले, “शेतकऱ्याला केवळ मदत करुन उपयोग नाही त्यांच्यापर्यंत पाणीही पोहोचवायला पाहिजे या भावनेतून आम्ही काम करतो आहोत. गेल्या पाच वर्षात पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात सिंचनाचे प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे काम आमच्या सरकारने केले. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून एकट्या सोलापूर जिल्ह्यातील ९२३ गावांना दुष्काळमुक्त करण्याचे काम केले. आता या पुढील पाच वर्षात दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.”