रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी केली डॉक्टरांना मारहाण

0
228

पुणे, दि. २६ (पीसीबी) : एकीकडे राज्यातील डॉक्टर कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावत आहे. तर दुसरीकडे पुण्यात रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. डॉ. सिद्धांत तोतला असे मारहाण झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील प्राईम रुग्णालयात हा सर्व प्रकार घडला आहे. याप्रकरणी डॉ. सिद्धांत तोतला यांना कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर 15 ते 20 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. तोतला 21 एप्रिलला कोंढवा येथील प्राईम रुग्णालयात भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी एक कार्डियक रुग्णवाहिका एका रुग्णाला घेऊन त्या ठिकाणी आली. यानंतर डॉ. तोतला यांनी त्याला तपासले. मात्र त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांना कळवले.
यानंतर त्याच रुग्णालयातील डॉ. ताबीश आणि डॉ. राहुल पाटील यांनी रुग्णाला तपासले. यानंतर त्यांनी त्या रुग्णाच्या मृत्यू झाल्याची माहिती तिकडे जमलेल्या 15 ते 20 जणांना दिली. यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉ. तोतला यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांसह लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. त्यासोबत रुग्णालयातील अकाऊंटट इमाम हुल्लर यांना लाथाबुक्क्याने मारहाण करुन जखमी करण्यात आले. तसेच सुरक्षा रक्षकाच्या केबिनची काच फोडण्यात आली. त्याशिवाय रुग्णालयासमोरील दरवाजावर दगड फेकून त्याचेही नुकसान करण्यात आले. ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यानंतर डॉ. तोतला यांनी याप्रकरणी कोंढवा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हा नोंदवला आहे