रिषभ पंत टीम इंडियाचे भविष्य आहे- विराट कोहली

0
371

गयाना, दि. ७ (पीसीबी) – टीम इंडियाने वेस्ट इंडीजला तिसऱ्या आणि अखेरच्या टी-ट्वेंटी सामन्यात ७ गडी राखून पराभूत करून तीन सामन्यांची मालिका ३-० अशा फरकाने खिशात घातली. कर्णधार विराट कोहली संघाच्या कामगिरीवर खूप खूश आहे. अखेरच्या लढतीत ६५ धावा करणारा युवा फलंदाज रिषभ पंतचे त्याने भरभरून कौतुक केले. पंत हा टीम इंडियाचे भविष्य आहे, असे तो म्हणाला.

रिषभ पंतने अखेरच्या सामन्यात ६५ धावांची सुरेख खेळी केली. कर्णधार विराट कोहलीसह त्याने तिसऱ्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी रचून टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्यानंतर पंतच्या कामगिरीबाबत विचारले असता, ‘आम्ही पंतकडे टीम इंडियाचे भविष्य म्हणून पाहतो. त्याच्यात कमालीची क्षमता आणि प्रतिभा आहे. आपण त्याला वेळ द्यायला हवा. त्याच्यावर कोणताही दबाव ठेवायला नको,’ असे विराट म्हणाला.

याआधीच्या दोन लढतींमध्ये पंत सपशेल अपयशी ठरला होता. दोन्ही सामन्यांत अनुक्रमे ० आणि ४ धावांवर बाद झाला होता. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्यानं वापसी केली आणि स्वतःला सिद्ध केले. वेस्ट इंडीजविरुद्धच्या अखेरच्या टी-२० सामन्यात त्याने ४२ चेंडूंमध्ये ६५ धावा केल्या. या खेळीत त्याने चार चौकार आणि चार षटकार लगावले.