रिझव्‍‌र्ह बँकेने ‘येस’ बँकेवर घातले निर्बंध अनेक बँका अडचणीत

0
525
मुंबई, दि.७ (पीसीबी) – बँकेच्या खातेदारांना ५० हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढण्याचे निर्बंध घालण्यात आल्यानंतर शुक्रवारी सकाळी बँक शाखा सुरू होताच ठेवीदार, ग्राहकांची गर्दी उसळली. राज्यात बँकेच्या शाखा तसेच एटीएमजवळ तपास यंत्रणांना सुरक्षितता वाढवावी लागली. येस बँकेबरोबर होणाऱ्या अप्रत्यक्ष व्यवहारांवर विपरीत परिणाम झाला असून अनेक तंत्रस्नेही वेतन देय तसेच दलाली पेढी मंचावर अस्वस्थता निर्माण झाली. येस बँकेची भागीदार फोनपेची सेवा तात्पुरती खंडित झाली.
येस बँकेत पिंपरी महापालिकेच्या तब्बल ८०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेला घरघर लागल्याने महापालिका धास्तावली असून कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींमध्ये संभ्रमावस्था आहे.  नाशिक महापालिका, शिक्षण मंडळ, स्मार्ट सिटी सारख्या कंपन्यांच्या सुमारे १०० कोटींच्या ठेवी येस बँकेत आहेत.  तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘येस’ बँकेमध्ये १९१ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत.
रिझव्‍‌र्ह बँकेने ‘येस’ बँकेवर निर्बंध घातल्याने या बँकेत ठेवी ठेवणाऱ्या राज्यातील १०९ बँका अडचणीत आल्या असून त्यात विदर्भातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह काही नागरी बँका व काही पत संस्थांचाही समावेश आहे. या बँकांचे सर्व ‘ऑनलाईन’ व्यवहार ठप्प झाले होते. व्यापाऱ्यांनी येस बँकेशी संबंधित धनादेशही स्वीकारण्यास नकार दिल्याने खळबळ उडाली.
येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या वरळी येथील घरावर ईडीने शुक्रवारी रात्री छापा टाकला. काही वित्त तंत्रज्ञान कंपन्यांना दिलेली कर्जे थकीत झाली. त्यासाठी परदेशातील पैसा कपूर यांनी वापरल्याचा संशय आहे.
येस’ बँकेवरील र्निबधामुळे नागपुरातील आनंद नागरी सहकारी बँकेसह विदर्भातील अकोला मर्चन्ट को. ऑपरेटिव्ह बँक, अकोला अर्बन अकोला, वाना सहकारी बँक हिंगणघाट, महिला अर्बन गोंदिया, वर्धा नागरी सहकारी बँक वर्धा, आशीर्वाद महिला नागरी सहकारी बँक वर्धा, यवतमाळ जिल्हा सहकारी बँक, यवतमाळ अर्बन सहकारी बँक, अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चिखली अर्बन सहकारी बँक, विदर्भ र्मचट सहकारी बँकांसह संपूर्ण राज्यातील १०९ बँकांचे ऑनलाईन व्यवहार ठप्प झाल्याची माहिती आहे.