राहुलचे शतक; पंत, पंड्याची टोलेबाजी

0
226

पुणे, दि. 27 (पीसीबी) : लोकेश राहुलचे शतक आणि अखेरच्या पाच षटकात र्दिक पंड्या, रिषभ पंत यांनी केलेल्या मनमोकळ्या फटकेबाजमुळे भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध ६ बाद ३३६ धावा केल्या. अखेरच्या चाळीस षटकांत भारतीय डावाने चांगला वेग घेतला होता. मात्र, राहुल आणि पंत बाद झाल्यामुळे हा वेग शेवटपर्यंत कायम राहिला नाही. कर्णधार बदलला तरी नाणेफेक इंग्लंडनेच जिंकली. फलंदाजीला पूर्णपणे पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर इंग्लंड कर्णधार जोस बटलरने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्याचा काहिसा अतर्क्य निर्णय घेतला. इंग्लंडने संघात तीन बदल करताना डेविड मलान, लियाम लिव्हिंग्स्टोन आणि रीस टॉप्सी यांनी संधी दिली. भारताने श्रेयस अय्यरच्या जागी रिषभ पंतला निवडले. भारताने हा एकमेव बदल केला.

प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारताला या वेळी सुरवात चांगली मिळाली नाही. उंचापुऱ्या टॉप्सीने सलामीचा फलंदाज शिखर धवनला बाद केले. त्यानंतर जोशात असणाऱ्या रोहित शर्माला सॅम करनने बाद केले. त्या वेळी इंग्लंडचा निर्णय अचूक ठरणार की काय अशी शंका आली. पण, त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या या गहुंजे येथीर मैदानावर फक्त भारतीय फलंदाजांचीच चलती राहिली. कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलने हळू हळू डाव बांधायला सुरवात केली. जम बसण्यासाठी त्यांनी घाई केली नाही. पण, एकेरी दुहेरी धावांचे महत्व पटवून देत कोहलीने आपल्या खेळीबरोबर संघाचा डावही उभारला. टी २० क्रिकेटमध्ये अपयशाचे धनी राहिलेल्या राहुलने त्याला सुरेख साथ केली. या जोडीच्या या नियोजनबद्ध खेळीने भारताच्या डावाचा पाया भक्कम केला.

कोहली, राहुल यांची पाठोपाठ अर्धशतके पूर्ण झाली. या प्रवासात इंग्लंड कर्णधार आणि यष्टिरक्षक जोस बटलरने रशिदच्या गोलंदाजीवर कोहलीचा झेल सोडला. तेव्हा आता अनेक सामन्यापासून प्रतिक्षेत असलेली कोहलीची शतकी खेळी बघायला मिळणार असे वाटले. पण, ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. रशिदनेच कोहलीला बटलरकडेच झेल देऊन बाद केले. कोहलीने ६६ धावांची खेळी करताना राहुलच्या साछी १४१ चेंडूंत १२१ धावांची भागीदारी केली. भारताची तोपर्यंत साडे चारची धावगती होती. कोहली बाद झाल्यावर रिषभ पंतच्या येण्याने हे चित्र बदलले. भारतीय फलंदाजीने जणू वरचा गियर टाकला आणि चौकार, षटकारांबरोबर धावा बरसू लागल्या.

पंत आणि राहुल या जोडीचा खेळ म्हणजे एक तुफान होते. या जोडीने अखेरच्या दहा षटकांत इंग्लंडच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. डावातील चाळीस षटके संपली तेव्हा ३ बाद २१० अशी स्थिती होती. पण, त्यानंतर ४५व्या षटकात राहुल बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या २७३ होती. पाच षटकांत ६३ धावांचा पाऊस या जोडीने पाडला. या दरम्यान राहुलने आपले पाचवे शतक साजरे केले. राहुल आणि पंत जोडीने ८० चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली. राहुलरने ११४ चेंडूंत संयमी १०८ धावांची खेळी करताना ७ चौकार, २ षटकार लगावले. त्यानंतर पंत आणि हार्दिक पंड्याने फटकेबाजीचा मूड कायम ठेवला. पण त्यांचा वेग टिकला नाही. पंत ४० चेंडूंत ७७ धावांची खेळी करून बाद झाला. त्याने ३ चौकार आणि सात षटकार ठोकले. हार्दिकने चार षटकार खेचले, त्यानंतरही भारताचा डाव ३३६ धावांवर मर्यादित राहिला.

संक्षिप्त धावफलक –
भारत ५० षटकांत ६ बाद ३३६ (लोकेश राहुल १०८ (११४, चेंडू, ७ चौकार, २ षटकार), रिषभ पंत ७७ (४० चेंडू,३ चौकार, ७ षटकार), विराट कोहली ६६ (७९ चेंडू, ३ चौकार, १ षटकार), हार्दिक पंड्या ३५ (१६), रीस टॉप्सी २-५०, टॉम करन २-८३, आदिल रशिद १-६५)