भारताचे आव्हान मनीषवर अवलंबून

0
401

पुणे, दि. 27 (पीसीबी) : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित 15000डॉलर केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत मनीष सुरेशकुमार हा एकमेव खेळाडू उपांत्य फेरीपर्यंत आपले आव्हान राखू शकला. त्याच्यासह अमेरिकेच्या ऑलिव्हर क्रॉफर्ड व झेन खान, स्वीडनच्या जोनाथन म्रीधा यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताच्या अर्जुन कढेला पराभवाचा सामना करावा लागला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत सहाव्या मानांकित भारताच्या मनीष सुरेशकुमार याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या ग्रेट ब्रिटनच्या हेनरी पॅटनचा 3-6, 7-6(3), 6-4 असा पराभव केला. हा सामना 2 तास 52 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरवातीला सावध खेळ केला. सामन्यात 4-3 अशा फरकाने हेन्री आघाडीवर असताना त्याने मनीषची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मनीषने आपले कौशल्य पणाला लावले. साव पवित्रा घेताना आपल्याकडून चुका होणार नाहीत याची काळजी घेत त्याने हा सेट टायब्रेकमध्ये नेला आणि बाजी मारली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये आठव्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या होत्या. नवव्या गेमला ही बरोबरीची कोंडी फुटली आणि मनीषने ब्रेकची संधी साधत आघाडी घेतली. पुढच्या गेमला आपली सर्व्हिस राखत उपांत्य फेरीच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.

अमेरिकेच्या चौथ्या मानांकित ऑलिव्हर क्रॉफर्ड याने भारताच्या सातव्या मानांकित अर्जुन कढेचा 6-3, 7-6(5) असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. हा सामना 1 तास 43 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये ऑलिव्हरने सुरेख सुरवात करत अर्जुनची तिसऱ्या, पाचव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व सामन्यात 4-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर पुढच्याच गेममध्ये अर्जुनने ऑलिव्हरची सर्व्हिस भेदून हि आघाडी कमी केली. परंतु आघाडीवर असलेल्या ऑलिव्हरने अर्जुनची सर्व्हिस मोडीत काढत नवव्या गेममध्ये पुन्हा सर्व्हिस ब्रेक केली आणि सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये अर्जुनने आक्रमक सुरवात करताना प्रारंभीच ब्रेकची संधी साधत ३-० अशी आघाडी घेतली. मात्र, त्याला हा जोश टिकवता आला नाही. चौथ्या गेमला ब्रेकची संधी साधताना ऑलिव्हरने लय मिळवली. अर्जुन आघाडी गमावून बसला आणि बरोबरीत चाललेला सेट टायब्रेकरमध्ये गेला. या वेळी ऑलिव्हरने बाजी मारत विजय मिळविला.

स्वीडनच्या पाचव्या मानांकित जोनाथन म्रीधाने दुसऱ्या मानांकित आर्यलँडच्या सिमॉन कारचा 7-5, 2-6, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. अमेरिकेच्या आठव्या मानांकित झेन खानने आपली विजयी मालिका कायम ठेवत ग्रेट ब्रिटनच्या तिसऱ्या मानांकित एडन म्युकुकचा 4-6, 6-4, 6-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दुहेरीत उपांत्य फेरीत स्वित्झर्लंडच्या लुका कॅस्टेलनुव्हो व भारताच्या अर्जुन कढे या जोडीने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या अन्वित बेंद्रे व परीक्षित सोमाणी या जोडीचा 6-4, 6-4 आणि आयर्लंडच्या सिमॉंन कार व अमेरिकेच्या अलेक्झांडर कोटझेन यांनी अमेरिकेच्या झेन खान व चेक प्रजाकसत्ताकच्या डालिबोर सेव्हर्सिना यांचा 6-4,3-6,10-7 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

निकाल: उपांत्यपूर्व फेरी : एकेरी :

जोनाथन म्रीधा(स्वीडन)[5] वि.वि.सिमॉन कार(आर्यलँड)[2] 7-5, 2-6, 6-1;
झेन खान(अमेरिका)[8] वि.वि.एडन म्युकुक(ग्रेट ब्रिटन) [3] 4-6, 6-4, 6-0;
ऑलिव्हर क्रॉफर्ड(अमेरिका)[4] वि.वि.अर्जुन कढे(भारत)[7] 6-3, 7-6(5);
मनीष सुरेशकुमार(भारत)[6]वि.वि.हेनरी पॅटन(ग्रेट ब्रिटन)3-6, 7-6(3), 6-4;

दुहेरी : उपांत्य फेरी :

लुका कॅस्टेलनुव्हो(स्वित्झर्लंड)/अर्जुन कढे(भारत)[2]वि.वि. अन्वित बेंद्रे(भारत)/परीक्षित सोमाणी(भारत)6-4, 6-4;
सिमॉंन कार(आर्यलँड)/अलेक्झांडर कोटझेन(अमेरिका)वि.वि. झेन खान(अमेरिका)/डालिबोर सेव्हर्सिना(चेक प्रजासत्ताक) 6-4,3-6,10-7