विरोधकांना सुरुंग: जिल्हाध्यक्षासह २४२ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

0
713

नांदेड, दि. १ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी सायंकाळी नांदेड जिल्ह्यात झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांच्यासह २४२ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.

जिल्हा भाजपच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भरतीची नोंदही येथे झाली. लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपने चिखलीकर यांच्या माध्यमातून पराभूत केले. त्यानंतर पक्षाच्या जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री पहिल्यांदा नांदेडमध्ये आले असून त्यांनी शुक्रवारी येथे मुक्काम ठोकला. नांदेड शहरात दाखल होण्यापूर्वी मागील काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे काही दिग्गज नेते भाजपमध्ये दाखल झाले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे काँग्रेसचे माजी खासदार भास्कर खतगावकर यांनी २०१४ मध्ये भाजप प्रवेशाची सुरुवात करून नंतर जिल्ह्यात पक्षाचा चांगला विस्तार केला. त्यानंतर भाजपकडून खासदार झालेल्या चिखलीकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात आणले. तर गोरठेकरांच्या भाजप प्रवेशामुळे उमरी व धर्माबाद नगर परिषदा आपोआप भाजपच्या ताब्यात आल्या आहेत.