‘राष्ट्रवादी’च्या जिल्हा सरचिटणीसपदी विशाल तुळवे, तर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोदसिंह गोतारणे यांची निवड

0
256

पुणे, दि.११ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा सरचिटणीसपदी विशाल तुळवे यांची, तर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोदसिंह गोतारणे यांची निवड करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते तुळवे व गोतारणे यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

विशाल तुळवे संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष, तर प्रमोदसिंह गोतारणे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यात भरीव योगदान देत आहेत. दोघांच्या याच कार्याची दखल घेत अजित पवार यांनी या दोघांवर पक्षाच्या कामाची जबाबदारी सोपवली आहे. यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, शिरूरचे आमदार अशोक पवार, जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या उपस्थितीत तुळवे व गोतारणे यांची नियुक्ती झाली.

यावेळी पुणे जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामध्ये अविनाश करंजे, दिनेश भुजबळ, विक्रम हरपुडे, श्रीकांत करंजे, शिवाजी बोत्रे, सोमनाथ बोत्रे, सचिन गोळे, बाळासाहेब साने, अनिल घनवट, प्रतीक कांबळे, मयूर दिवे, संतोष कांबळे, विजय कलशेट्टी, चेतन ओव्हाळ, दिगंबर ओव्हाळ, शुभम नेटके, सागर रोहिटे, अतुल शिंदे,ओंकार रणपिसे, अजय मूर्ती इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य करणार असून, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मेहनत घेऊ. आगामी निवडणुकांत जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला जास्तीत जास्त यश मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करू,” असा विश्वास तुळवे व गोतारणे यांनी व्यक्त केला.