राष्ट्रवादीकडून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी अॅड. उज्वल निकम यांच्या नावाची चर्चा

0
978

जळगाव, दि. ५ (पीसीबी) – काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाटपात जळगाव लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळणार आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे राज्याचे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांचे नावावर चर्चा झाल्याचे समजते. परंतु, अॅड. निकम यांच्या सहमतीनंतरच जळगाव मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीकडून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीची शुक्रवारी मुंबईत बैठक झाली. पक्षाचे सर्व नेते, जिल्हाध्यक्ष व इच्छुक उमेदवार बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव या दोन लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली. बैठकीला जळगाव जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, आमदार डॉ. सतीश पाटील, मजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार अॅड. वसंतराव मोरे, माजी आमदार संतोष चौधरी आदी उपस्थित होते.

जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून माजी खासदार अॅड. वसंतराव मोरे, अमळनेरचे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील, चाळीसगावचे प्रमोद पाटील यांच्या नावाची चर्चा झाली. त्याचप्रमाणे राज्याचे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांच्याही नावाची चर्चा झाल्याचे समजते. परंतु, अॅड. निकम यांच्या सहमतीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले. अॅड. निकम यांच्यासोबत चर्चा करण्याची जबाबदारी विधानसभेचे माजी सभापती अरूण गुजराथी यांच्यावर सोपवण्यात आले आहे. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी माजी विधानसभा सभापती अरूण गुजराथी यांचे नाव पुढे आले आहे. तसेच माजी आमदार संतोष चौधरी यांच्याही नावाची चर्चा झाल्याचे समजते.