‘राष्ट्रपती राजवट- महाराष्ट्रासाठी एकमेव मार्ग ?’

0
599

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती तोडावी, असा सल्ला राज्यसभेचे खासदार आणि भाजपाचे जेष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी बुधवारी दिला. ‘राष्ट्रपती राजवट- महाराष्ट्रासाठी एकमेव मार्ग ?’ हा लेख शेअर करताना स्वामींनी ही टिप्पणी केली आहे. दरम्यान, अगोदरच कोरोनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात भाजपा विरुध्द शिवसेना प्रणीत आघाडी सरकार यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्याने राजकीय अस्वस्थता वाढली आहे. आता सुब्रमण्याम स्वामी यांनी त्यात भर टाकल्याने रंगत आली आहे.

“आता किंवा कधीच नाही, उद्धव ठाकरे, आताच राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबत असलेली युती तोडा, अन्यथा ते तुम्हाला कट रचल्याप्रमाणे उद्ध्वस्त करतील” अशा आशयाचे ट्वीट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाखाच्या पार गेली आहे. कोरोनाग्रस्तांपैकी 33 टक्के महाराष्ट्रातील, तर देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 20 टक्के मुंबईत आहेत, अशी माहिती सुब्रमण्यम स्वामी यांनी शेअर केलेल्या ‘पीगुरुज’ वेबसाईटच्या लेखात आहे. या लेखात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा सल्ला या लेखात केला आहे. मात्र या तर्कानुसार भाजपशासित गुजरात राष्ट्रपती राजवटीसाठी योग्य आहे, असं उत्तर काही जणांनी सुब्रमण्यम स्वामी यांना दिलं. पंधरा दिवसांपूर्वीच स्वामी यांनी मोदी सरकारला स्थलांतरित मजुरांकडून रेल्वे भाडे आकारण्याबद्दल सवाल केला होता.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील भाजप नेते ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारला आक्रमकपणे लक्ष्य करत आहेत. संकटाला तोंड देण्यासाठी ज्याप्रमाणे प्रभावी पावले उचलणे आवश्यक होते, ती वेळेवर घेतलेली नाहीत,असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. भाजपाने महाराष्ट्रभर राज्य सरकारच्या विरोधात आंदोलने सुरू केली आहेत.