राम शिंदें ना जो न्याय तो पंकजा मुंडेंना का नाही ?

0
344

– पंकजा मुंडे यांच्यामुळे भाजपचे काही नेते धास्तावलेत
– आमदार सुनिल शेळके यांची फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) : विधान परिषदेसाठी तीव्र इच्छूक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांना पक्षाने डावलल्याने ओबीसी समाजात तीव्र असंतोष आहे. त्यातून मुंडे समर्थकांनी औरंगाबाद येथील भाजपच्या कार्यालयावर मोर्चा काढून जाब विचारला. पंकजा यांची लोकप्रियता आणि नेतृत्व क्षमतेमुळे भाजपचे काही नेते धास्तावले असून या भीतीतून त्यांना वारंवार डावलले जात आहे, असे पूर्वाश्रमीचे भाजपाई कट्टर मुंडे समर्थक व आताचे मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे. त्यांच्या रोख भाजपाचे नेते विधानसभेतील विरोधीनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे.
पंकजा मुंडे यांना पक्षाकडून राज्यसभेवर अथवा विधान परिषदेवर संधी दिली जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. प्रत्यक्षात दोन्हींकडे पक्षाने त्यांना डावलले आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत कर्जतमधून (जि. नगर) पराभूत झालेले प्रा. राम शिंदे यांना विधान परिषेदवर संधी दिली. मग, हा न्याय पंकजांना लागू होत नाही का? अशी विचारणा आमदार शेळके यांनी केली.

विधानसभेला पराभूत झालेल्यांना विधान परिषदेवर संधी द्यायची नाही, असं पक्षाने ठरवलं आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मागे सांगितलं होते. मग, राम शिंदे यांना विधान परिषद कशी दिली, असे ते म्हणाले. भाजप महिला आघाडी मोर्चाच्या पिंपरी-चिंचवडकर प्रदेशाध्यक्षा उमा खापरेंनाही विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. त्यावर मुंडे समर्थकांना संधी दिल्याचे भासवून गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजांना मात्र दूर ठेवायचे, असल्या राजकीय खेळ्या आता जास्त दिवस टिकणार नाहीत, असा इशाराही आमदार शेळकेंनी दिला. 

भाजपच्या काही नेत्यांना पंकजांची भीती वाटत असल्यामुळेच त्यांना संधी नाकारली आहे. त्यांचे कोणत्याही परिस्थितीत राजकीय पुर्नवसन होऊ द्यायचे नाही, ही खेळी यानिमित्तानं पुन्हा स्पष्ट झाली आहे. विधान परिषदेची संधी मिळाल्यास राज्याच्या राजकारणात त्या पुन्हा सक्रिय होतील. उत्कृष्ट कार्यपद्धतीने आपला ठसा उमटवतील. तो आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका ठरु शकतो. ही भीती वाटत असल्यामुळेच भाजपचे काही नेते त्यांना वारंवार डावलून राजकारणातील नवे डाव आखण्याचे प्रयत्न करीत असल्याचे मागील काही काळापासून दिसून येत आहे, याकडे आमदार शेळके यांनी लक्ष वेधले आहे. मात्र, मुंडे कुटुंबाला संघर्ष हा काही नवीन नाही. विधान परिषदेत संधी मिळत नसली तरी (स्व.) गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार असलेल्या पंकजाताई सर्वसामान्य कष्टकऱ्यांसाठी सक्रिय राहून एके दिवशी नक्कीच स्वतःचे अस्तित्व दाखवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.