राज ठाकरे-शरद पवार यांच्या विमान प्रवासात नेमके काय घडलं!

0
1710

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – औरंगाबाद विमानतळाहून मुंबईकडे निघालेल्या विमानात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जेव्हा प्रवेश केला. तेव्हा ते त्यांच्या सीटवर बसत होते. राज आणि बाळा नांदगावकर यांच्या सीट्स उजवीकडे बाजूबाजूला होत्या, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे आमदार, राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या सीट्स डावीकडच्या रांगेत बाजूबाजूला होत्या. विमानातील आपल्या सीटवर शरद पवार बसल्यावर त्यांच्या बाजूच्या सीटवर अर्जून खोतकर बसणार…, इतक्यात पवार त्यांना म्हणाले, “तुम्ही (खोतकर) तिथे बसा, राजला इथे (माझ्या बाजूला) बसू द्या.”  असे कीर्तिकुमार शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

 पवार यांच्या शब्दाचा मान राखत खोतकर उजवीकडच्या रांगेत म्हणजे बाळा नांदगावकरांच्या बाजूला जाऊन बसले आणि त्यानंतर पुढच्या साधारण तास-दीड तासाच्या विमान प्रवासात शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या गप्पा रंगल्या. राजकारणातील प्रत्येक गोष्ट प्लांटेड असते, हा एक गैरसमज आहे. राजकीय नेत्यांच्याही आवडीनिवडीची काही खास माणसं असतात, त्यांनाही आवडीच्या माणसांशी गप्पा मारायला आवडतं, हे आपण विसरतो.या गप्पांमध्ये राजकीय विषय निघालेच नसतील, असे म्हणणंही मूर्खपणाचं ठरेल.

शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या गप्पा सुरु असताना त्यात थोड़ा वेळ का होईना पण सहभागी होण्याचा मोह शिवसेनेचे आमदार, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि मनसे नेता बाळा नांदगावकर यांनाही आवरला नाही. त्यासाठी सीट सोडून हे दोघे (मुंबईतल्या लोकल ट्रेनप्रमाणे) विमानातही उभे राहिले!