राज ठाकरे यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

0
436

मुंबई, दि.६ (पीसीबी) – राज्यभरात सध्या मशिद आणि मंदिरावरील भोंग्यांचा विषय तापला आहे. विविध शहरांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील धार्मिद सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

राज ठाकरे यांनी पुणे, ठाणे आणि औरंगाबाद येथे सभा घेवून राष्ट्रीय नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टिका-टिप्पणी करीत त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘मशिदीवरील भोंगे काढा, अन्यथा परिणाम वाईट होतील’ असे चिथावणीखोर वक्तव्य करीत मशिदीसमोर हनुमान चालीसा म्हणण्याचे आदेश ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना देण्यात आले. त्यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

यासंबंधी त्यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन, मुंबई पोलीस आयुक्त तसेच औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडे केली होती. पंरतु, पोलिसांकडून ठाकरे यांच्याविरोधात केवळ जामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. अशात पोलिसांना ठाकरे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्याची विनंती जनहित याचिकेतून पाटील यांनी केली आहे. राज्यातील धार्मिक वातावरण बिघडवू बघणाऱ्या, प्रक्षोभक भाषणे करणाऱ्या राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदा, राजकीय दौरे, राज्यातील विविध शहरांच्या भेटींच्या कार्यक्रमांवर तूर्त बंदी घालण्याची मागणी देखील याचिकेतून करण्यात आली आहे. अपक्ष आमदार आणि खासदार राणा दाम्पत्याने मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर ज्याप्रमाणे देहद्रोहाची कारवाई करण्यात आली तशीच कारवाई ठाकरे यांच्यावर करावी, अशी विनंती मा. उच्च न्यायालयाकडे करण्यात आल्याचे देखील पाटील म्हणाले.