राज्यात पुन्हा छमछम; डान्सबारवरील अटी सर्वोच्च न्यायालयाकडून शिथिल

0
957

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – राज्य सरकारने डान्सबारवर घातलेल्या कठोर अटी सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरूवार) शिथिल केल्या आहेत. यामुळे मुंबई आणि राज्यात डान्सबार सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डान्सबारवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठविली होती. त्यानंतर जनमताचा रेटा आणि सरकारवर उठवलेली टीकेची झोड यामुळे राज्य सरकारने २०१६ मध्ये डान्सबारसंदर्भात नवा कायदा आणला होता. याविरोधात डान्सबार मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर आज न्यायालयाने निर्णय दिला.

न्यायालयाने  राज्य सरकारच्या जाचक अटी शिथील केल्या आहेत. राज्य सरकारचे अनेक नियम  रद्द केल्याने आता मुंबई व राज्यातील डान्सबार सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रात्री साडे अकरा वाजेपर्यंत डान्सबार सुरु ठेवण्याची अट न्यायालयाने  मान्य केली आहे.

डान्सबारमध्ये तसेच बाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करणे. धार्मिक स्थळापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत डान्सबारना परवानगी न देणे,  अशा काही अटी न्यायालयाने रद्द केल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा राज्यात डान्सबारमध्ये छमछमचा आवाज येणार आहे.