राजभवनात मुस्लिमांना नमाजासाठी देण्यात आलेल्या जागेप्रमाणे हिंदूंनाही उपासनेसाठी मोठी जागा द्यावी ! – ‘या’ समितीची मागणी

0
220

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – राजभवनातील मुस्लिम कर्मचार्‍यांसाठी नमाज पठणासाठी राजभवनात एक खोली देण्यात आली आहे. तिथे बाहेरील मुस्लिमही नमाज पठणासाठी येत होते. शुक्रवारी तेथे गर्दी होत होती. कोरोना काळात राज्यशासनाच्या निर्देशानुसार राजभवनातील प्रार्थनास्थळ अन्य प्रार्थनास्थळांप्रमाणे बंद झाले होते. त्यावर ‘रझा अकादमी’ या मुस्लिम संघटनेकडून मुस्लिमांसाठी नमाजसाठी राजभवनातील सदर मशीद खुली करावी, अशी मागणी एका पत्राद्वारे राज्यपालांकडे करण्यात आली आहे. राजभवनात मुस्लिमांसाठी मशीद वा जागा दिली जात असेल, तर शासन सर्वधर्मसमभाव मानणारे असल्यामुळे राजभवनात हिंदूंनाही उपासना, आरती, पूजा आणि उत्सव साजरे करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आज हिंदु जनजागृती समितीने एका पत्राद्वारे राज्यपालांकडे केली आहे, असे समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवलेल्या पत्रात समितीने म्हटले आहे की, राज्यघटनेप्रमाणे भारतीय शासन आणि प्रशासन व्यवस्था धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) आहे. सर्वधर्मसमभावाचे पालन करणारी आहे. त्यामुळे कोणत्याही विशिष्ट जाती-धर्माला झुकते माप देता येत नाही. राज्यघटनेत न्याय, बंधूता, समता…’ आदी मूलभूत तत्त्वाचे पालन बंधनकारक आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे राजभवनात मुस्लिम कर्मचार्‍यांना एका मशीदीसाठी जागा देण्यात आली आहे. त्याचधर्तीवर आणि नियमानुसार हिंदू कर्मचार्‍यांनाही त्यांच्या संख्येनुसार राजभवनात मंदिरासाठी मोठी जागा देण्यात यावी. जेणेकरून राजभवनातील हिंदू कर्मचारी आणि बाहेरील हिंदू महाआरती, पूजा, उपासना, तसेच विविध धार्मिक उत्सव आनंदाने साजरे करतील. तसेच त्या जागेत जाऊन त्यांना नित्य उपासना करता येईल, असेही श्री. घनवट यांनी म्हटले आहे.