‘ती’ मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीही नाही – देवेंद्र फडणवीस

0
181

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपानं सरकारवर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला. त्याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सामनाला दिलेली मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीही नाही,” असं टीकास्त्र फडणवीसांनी डागलं आहे.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. राज्य सरकारच्या या वर्षपूर्तीनिमीत्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली.

सरकार विरोधात मत मांडणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार –
अर्णब गोस्वामी, कंगना रणौत प्रकरणी महाविकास आघाडी सरकारला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर फडणवीसांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका केली. सरकारविरोधी मत मांडणाऱ्या व्यक्तींचा आवाज दाबण्याचं काम राज्य सरकार करत आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत न दिलेलं आश्वासन लक्षात आहे, परंतू शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदतीसाठी दिलेलं वचन लक्षात नाही?? शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाचं काय करणार?? असा सवाल विचारत फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली.

भाजप कधीही कोणाच्या परिवारावर हल्ला करत नाही –
वर्षभराच्या कालावधीत मराठा आरक्षण, नैसर्गिक आपत्तीने कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यांना मिळालेली अपुरी मदत या सर्व मुद्द्यांवरुन फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली. भाजपा कधीही कोणाच्याही परिवारावर हल्ले करत नाही, परंतू मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून संयम दाखवण्याची गरज असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं.