राजकारण्यांना यावर भाष्य करण्याचा काय अधिकार आहे? – अमृता फडणवीस

0
332
मुंबई, दि.७ (पीसीबी) – महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस  यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. “मुख्यमंत्री पद सोडावं लागल्यानंतर तुम्हाला वर्षा बंगला सोडावा लागला. त्यानंतर वर्षा बंगल्यामधील भिंतीवर काही मजकूर रेखाटल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यावरुन अनेक वाद आणि चर्चा झाल्या. अगदी तुमच्या मुलीचाही त्यावेळेला उल्लेख झाला. ही सगळी परिस्थिती तुम्ही एक स्त्री, आई आणि पत्नी म्हणून कशी हाताळली,” असा प्रश्न  माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला.
वर्षावरील भिंतींवरील मजकुरासंदर्भात स्पष्टीकरण देताना अमृता यांनी तो मजकूर कोणी लिहिला याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही असं स्पष्ट केलं. “जेव्हा आम्ही वर्षा बंगला खाली केला. सर्व काही तपासलेलं होतं. मात्र लहान मुलांना सवय असते कधी कधी रेघोट्या ओढायची भिंतीवर. आमच्या मुलीच्या बऱ्याच मैत्रिणी घरी यायच्या जायच्या. आम्ही बंगला सोडताना सर्व रुम तपासल्या तेव्हा तेथे काहीच नव्हते. मात्र खाली कर्मचाऱ्यांच्या खोल्या (सर्व्हट क्वॉटर्स) आहेत. तिथे काही असल्यास मला त्याचा अंदाज नाही,” असे अमृता म्हणाल्या.
“घरातील भिंतीवर मजकूर लिहिला असल्याची बातमी आम्हाला वृत्तपत्रांमधून घर सोडल्यानंतर एका महिन्याने समजली. या दरम्यानच्या काळात कोणी काही मस्ती म्हणून हे केलं असेल तर ते आम्हाला ठाऊक नाही. काही इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये यासंदर्भातील वृत्त पहिल्या पानावर होते. त्यामुळे आम्ही आमच्या मुलीकडे यासंदर्भात चौकशीही केली. आम्ही विचारले तिला की तू लिहले आहेस का? त्यावर तिने नाही आम्ही असे काहीही लिहिलेलं नव्हते असे आम्हाला सांगितले. हस्ताक्षरही तिच्यासारखं नाही. अनेक मुले आमच्या घरी येतात. लहान मुले अशाप्रकारे भिंतीवर लिहितात. त्यामुळे एकतर आम्ही घर सोडल्यानंतर ही बातमी समोर यायच्या कालावधीमध्ये कोणीतरी हे केलेले असेल. तसे नसले तर मुलींनी केले असेल आणि ते सांगायला घाबरली असतील,” असे अमृता यांनी सांगितले.
“वर्षावरील भिंतीवर लिहिलेल्या मजकूर हा राजकीय विषय बनवण्याची गरज नव्हती. मुलांच्या मनात आहे ते त्यांनी निखळपणे लिहिले. राजकारण्यांना यावर भाष्य करण्याचा काय अधिकार आहे?,” असा सवालही अमृता यांनी उपस्थित केला.