रहाटणीतील सनशाईन व्हिला गृहनिर्माण सोसायटीत कंपोस्ट खतनिर्मिती प्रकल्प; नगरसेवक काटे व नगरसेविका कुटेंच्या हस्ते उद्घाटन

0
824

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – रहाटणी येथील सनशाईन व्हीला या गृहनिर्माण सोसायटीमध्ये १५० रो हाऊस मधील ओल्या कचऱ्यापासुन तीन टन कंपोस्ट खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भाजपचे स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मलाताई कुटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले की,” पिंपळे सौदागरची स्मार्ट सिटीसाठी करण्यात आलेली निवड ही या परिसरातील नागरिकांनी सतत आपल्या सहभागातून व योगदानातून योग्य ठरवली आहे. प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावत बरोबरीने ओला कचरा विल्हेवाट या गंभीर प्रश्नावर मात करण्यासाठी तसेच यातून मार्ग काढण्यासाठी महानगरपालिकेला करत असलेल्या या अमूल्य सहकार्यबद्दल तसेच जनजागृतीबद्दल त्यांनी नागरिकांचे विशेष आभार मानले.

स्मार्ट सिटी ही फक्त पायाभूत सुविधेमुळे स्मार्ट होत नसते तर ती सुविधा उपभोगणारी जनशक्ती सुद्धा स्मार्ट असावी लागते आणि पिंपळे सौदागरवासीयांनी हा स्मार्टपणा सतत सिद्ध करून दाखवला असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील इतर गृहनिर्माण संस्थानी देखील अशाच पद्धतीने कंपोस्ट खत प्रकल्प राबवावेत. तसेच यामध्ये तयार होणाऱ्या खताचा आपल्याच सोसायटी परिसरातील गार्डनमध्ये वापर करता येईल. तसेच एक लोकप्रतिनिधी या नात्याने कंपोस्ट खत प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले”

यावेळी सोसायटीचे चेअरमन काकासाहेब सानप, प्रवीण तिवारी, राजेश गायकवाड, भास्कर शेजवळ, महेश सावंत, प्रवीण बालन व इतर सभासद उपस्थित होते.